पुणे । काश्मीर इतकाच नक्षलवादाचा प्रश्न गंभीर आहे, तो संपविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नक्षलवाद आणि गुन्हेगारीसारखे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रथम प्रयत्न केले पाहिजेत, असे मत नक्षलग्रस्त भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व मॉडर्न कॉलेज यांच्या वतीने बिंदुमाधव जोशी स्मरणार्थ ‘ग्राहकतीर्थ व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘नक्षलवाद आणि उपाय’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्याख्यानमालेचे उद्घाटन अॅड. प्रताप परदेशी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाऊ आदमणे, शिल्पकार विवेक खटावकर, सुभाष सरपाले, शाहीर हेमंत मावळे, उपप्राचार्य मिलिंद वाघमारे, प्रा. संगीता मावळे उपस्थित होते.
आर्थिक परिस्थिती नसल्याने पुन्हा गुन्हेगारीकडे
जगताप म्हणाले की, नक्षलवादी भागात काम केल्यानंतर तेथील अनेकांच्या हातात बदुकांच्या जागी पेन आणि डोक्यात अहिंसेचे विचार जागृत केले आहेत. गुन्हेगाराची शिक्षा संपल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर जातात. शिक्षकांची मुले शिक्षक, डॉक्टरांची मुले डॉक्टर होतात आणि गुन्हेगारांची मुले त्याच मार्गाकडे वळतात म्हणून गुन्हेगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी गुन्हेगारी दत्तक योजनेची सुरुवात केली. गुन्हेगारांची पुढची पिढी व्यसनाधीन नाही तर चांगल्या विचारांची घडवायची आहे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.
दहशतवाद आणि शिवचरित्र
‘भारतीय युवक आणि आव्हाने’ या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमालेत ‘दहशतवाद आणि शिवचरित्र’ या विषयावर पराग ठाकूर, ‘व्यसनाधिनता आणि राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग’ या विषयावर डॉ. मिलिंद भोई यांनी मार्गदर्शन केले. प्रा. संगीता मावळे यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. युवराज शेळके यांनी आभार मानले.