काश्मीर तणावामागे चीनचा हात!

0

नवी दिल्ली : काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असून, दक्षिण काश्मीरला अशांत वातावरणाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या तणावामागे चीनचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी केला. त्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली व राज्यातील परिस्थितीबाबत केंद्राला अवगत केले. राज्यात बाहेरून दहशतवादी येत असून, तणाव निर्माण करत आहेत. तसेच, राज्यातील कलम 370 हटविण्यासही त्यांनी स्पष्ट नकार दिला. राज्यातील अंतर्गत सुरक्षेकरिता केंद्राने दिलेल्या सहाय्याबद्दल त्यांनी राजनाथ सिंह यांचे आभारही मानलेत.

370 चा मुद्दा आमच्या भावनांशी जोडलेला
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, जम्मू-काश्मीरमधील वातावरण दूषित करण्यात बाहेरच्या शक्तींचा हात आहेच, पण आता चीनचाही त्यात हात आहे. काश्मीरमध्ये आपण केवळ कायदा आणि सुव्यवस्थेशी लढा देत नाही. जोपर्यंत संपूर्ण देश, राजकीय पक्ष या परिस्थितीत साथ देत नाहीत, तोपर्यंत ही लढाई आपण जिंकू शकत नाही. या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखवली आहे. याचा मला आनंद झाला आहे. सर्वजण काश्मीरच्या समस्यांचा एकीने सामना करत आहेत. राज्यात जीएसटीला मंजुरी देण्यात आली, त्यावेळी राष्ट्रपतींनी आम्हाला कलम 370 च्या मुद्द्यावर विशेष लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले होते. कलम 370 हा मुद्दा आमच्या भावनांशी जोडलेला आहे, असेही त्या म्हणाल्या.

संरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक सरकारच्या पाठिशी!
अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवरील दहशतवादी हल्ल्यानंतर चार दिवसांनी मेहबुबा मुफ्ती यांनी दिल्ली गाठले. या हल्ल्यानंतर केंद्राने मुफ्ती यांनी परिस्थिती योग्यरितीने हाताळल्याबद्दल त्यांचे कौतुक केले होते. काश्मीर खोरे सद्या अशांत असून, दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील तणाव व चीनचा वाढता हस्तक्षेप याबद्दल माहिती देण्यासाठी मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना, भेटीचा तपशीलही जाहीर केला. कालच, केंद्राने सर्व राजकीय पक्षांची बैठक घेऊन सिक्कीम भागातील चीनसीमेवर निर्माण झालेला तणाव, काश्मीर खोर्‍यातील परिस्थिती याबाबत माहिती दिली होती. सर्वच राजकीय पक्षांनी अशा परिस्थितीत केंद्र सरकारला साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री अरुण जेटली, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र व्यवहार सचिव जयशंकर यांचीदेखील उपस्थिती होती. त्यामुळे शनिवारी मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीला महत्व प्राप्त झालेले आहे.