काश्मीर ‘पकोडा’ तेलात फुटला

0

मुंबई । देश गंभीर संकटात असताना सरकार मात्र ‘पकोडे-भजी’ यावरच्या चर्चेत गुंतवून ठेवला जात आहे, काँग्रेसने दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले हा आरोप जे करत होते त्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले काय किंवा दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले काय? काश्मीर प्रश्‍नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे, असे म्हणत शिवसेनेने ’सामना’च्या संपादकीयातून पुन्हा एकदा मोदी सरकारच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित केला. पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे बोलले जाते, पण पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी हिंदुस्थानची नाडी काश्मिरात रोज सोडत आहेत व त्यामुळे तिरंग्यास मान खाली घालावी लागत आहे. देश गंभीर संकटात असताना ‘पकोडे-भजी’ यावर चर्चेत गुंतवून ठेवायचे व काश्मिरात आमच्या जवानांनी रोजच शहीद व्हायचे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे झाली आहेत. काश्मीर प्रश्‍नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे. जवान मरत आहेत व कश्मिरी पंडित अजूनही निर्वासित आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे व दिल्लीच्या धमक्या पोकळ ठरवल्या जात आहेत. गेल्या आठ दिवसांत सीमेवर ज्या घटना घडत आहेत त्या फक्त चिंताजनक नाहीत, तर बलाढ्य व शक्तिमान म्हणून मिरवणार्‍या देशाला मान खाली घालायला लावणार्‍या आहेत, असेेही यात म्हटले आहे.

गेल्या महिनाभरात पाकड्यांनी शंभरदा घुसखोरी व गोळीबार केला आणि त्यात आमचे पंधरा जवान शहीद झाले, तरी आमच्या देशात ‘पकोडे’ व ‘भजी’ तळण्यावर राजकीय चर्चा सुरू आहे. पाकिस्तानला चोख उत्तर देऊ, असे रोज बोलले जात आहे, पण राज्यकर्त्यांना उत्तर सापडत नाही काय? काश्मीर प्रश्‍नांचा सत्यानाश पंडित नेहरूंनी केला व काँग्रेस पक्षाला हा प्रश्‍न सोडवता आला नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्या हातात जनतेने राज्य दिले आहे. काँग्रेस पक्षाने याप्रश्‍नी नालायकी दाखवली व दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले, हा आरोप जे करत होते त्यांनी गेल्या चार वर्षांत पाकड्यांचे गुडघे फोडले काय किंवा दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले काय? अशा प्रकारे शिवसेनेने आता काश्मीर प्रश्‍नावरही मोदी सरकारला फैलावर घेण्यास सुरुवात केली आहे.

पाकविरोधात वातावरण असल्यास मोदी गप्प का?
पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिंमत काँगेस पक्षात नव्हती, पण इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा पराभव करून फाळणी केली होती. हिमतीचेच काम बाईंनी तेव्हा केले होते व त्या वेळी अमेरिका हिंदुस्थानविरोधात पाकिस्तानच्या बाजूने होती. आज अमेरिका मोदी यांच्या खिशात आहे व फ्रान्स, जर्मनी, इस्रायलसारखी राष्ट्रे मोदींच्या तालावर डोलत असल्याचे कानावर येते. पाकिस्तानला जगात एकाकी पाडल्याचे बोलले जाते. अमेरिकेने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्याचा आनंद दिल्लीने साजरा केला, पण पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी काश्मिरात रोज सोडत आहेत व त्यामुळे तिरंग्यास मान खाली घालावी लागत आहे.