संतप्त तरुणांनी केली बसवर तुफान दगडफेक
पिंपरी-चिंचवड : कासारवाडीत रस्ता ओलांडणारा तरुण पीएमपीएमएल बसची जोरदार धडक बसून जागीच ठार झाला. यानंतर काही संतप्त तरुणांनी बसवर तुफान दगडफेक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री दहाच्या सुमारास कासारवाडी येथील जेआरडी टाटा उड्डाणपुलावर घडली. साहेद आलम (वय 20, रा. कासारवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक शशीकांत वासाळे याला सांगवी पोलीसांनी अटक केली आहे.
एकुलता मुलगा; परिसरावर शोककळा
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएल बसचालक शशीकांत हा गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास त्याच्या ताब्यातील बस (एमएच 12 के क्यू 0936) हिंजवडी येथून भोसरीच्या दिशेने घेऊन जात होता. बस कासारवाडी येथील जेआरडी टाटा उड्डाणपुलावर आली असता, रस्ता ओलांडणार्या साहेद आलम या तरुणाला बसची जोरदार धडक बसली. यावेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या काही तरुणांच्या जमावाने बसवर तुफान दगडफेक केली. साहेद याचा आज सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबामध्ये दु:खाचे वातावरण आहे. बसचालक शशीकांत वासाळे याला सांगवी पोलीसांनी अटक केली आहे.