कासारसाई-हिंजवडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा निषेधार्थ महामोर्चा

0

अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीचा पुढाकार ; विविध शाळा, महाविद्यालयांचा सहभाग

अंबाजोगाई : कासारसाई-हिंजवडी, ता.मावळ जि.पुणे येथील ऊसतोड कामगार कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारा निषेधार्थ अंबाजोगाईत गुरूवार,दि.4 ऑक्टोबर रोजी महामोर्चा काढण्यात आला.महामोर्चासाठी अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीने पुढाकार घेतला.तर विविध सामाजिक संघटना, शाळा,महाविद्यालयांनी सहभाग घेवून महामोर्चा यशस्वी केला.“वुई वाँट जस्टीस”,भारत माता की जय,वंदे मातरम् च्या ना-यांनी परिसर दणाणून गेला होता.

शहरातील प्रमुख रस्त्यांवरून हा महामोर्चा काढण्यात आला.काळ्या फिती लावून, निषेधाच्या घोषणा देवून बॅनर,फलक घेवून शहरातील गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या शाळा, समाजविज्ञान महाविद्यालय, वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालय, जि.प.कन्या शाळा,रविवार पेठ,यांच्यासह आदी शाळा, महाविद्यालयातील एक हजारहून अधिक विद्यार्थीनी, युवती, युवक,यांच्यासह नंदकिशोर मुंदडा,नगरसेवक संजय गंभिरे,प्रा.अरूंधती पाटील,बालासाहेब शेप, संतोष काळे,अनंतराव घुले,विजय अंजाण, सचिन केंद्रे,वैजेनाथ देशमुख, प्रा.रमा पांडे,संध्या आरबाड आदींसह सामाजिक व राजकिय क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते, मान्यवर सहभागी झाले.

शिवाजी चौकात व उपविभागिय कार्यालयासमोर पथनाट्य सादर करून निदर्शने करण्यात आली.यावेळी आकांक्षा नवले पाटील व अमृता धानोरकर या मुलींनी महामोर्चास संबोधित केले.महामोर्चात सहभागी सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कृती समितीने केली होती. पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यास मोठी मदत केली.

अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कासारसाई-हिंजवडी, ता.मावळ जि.पुणे येथील ऊसतोड कामगार कुटूंबातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात निषेध नोंदवून अत्याचार करणा-या नराधमास कडक शासन करून त्यांना फाशी देण्यात यावी.सदरचा खटला जलदगती कोर्टात चालवणे,सदरच्या खटल्यातील आरोपींना फाशी देवून कडक शासन करावे,पिडित कुटूंबाच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेवून त्यांना संरक्षण द्यावे,पिडित कुटूंबास अर्थसहाय्य देण्यात यावे,पिडित कुटूंबाचे पुनर्वसन करून सामाजिक बांधिलकी जपावी,सदरच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.या मागण्या मान्य करून पिडितेस न्याय द्यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

सदरचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री ,महिला व बालविकास मंत्री, विरोधी पक्षनेते विधानसभा,विरोधी पक्षनेते विधान परिषद, पोलिस महासंचालक, महिला व बालहक्क आयोग यांना पाठवण्यात आले आहे.निवेदनावर अन्याय-अत्याचार विरोधी कृती समितीचे,अनंतराव घुले, गोविंद इप्पर, प्रा.नारायण सिरसाट, अनिरूध्द फड, सुधीर माले, यांच्यासह पन्नासहून अधिक जणांच्या स्वाक्ष-या आहेत.