साक्री । साक्री तालुक्यातील कासारे गावात गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठाच झाला नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आपला निषेध नोंदविला.याबाबत अधिक माहिती अशी की, कासारे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून भर उन्हाळ्यात पाण्यासाठी महिला व युवतींना पायपीट करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत होता.
वॉर्ड क्र.6 मध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणीच न आल्याने पाण्यावाचून होरपळण्याची वेळ नागरीकांवर आली आहे. पाणीपुरवठा न झाल्याने वॉर्ड क्र.6 मधील महिलांनी एकत्र येवून ग्रामपंचायतीवर धडक मारली. तेथेही निट उत्तर न मिळाल्याने आणि पाणीपुरवठा केव्हा होईल याचे कुठलेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकून आपला निषेध नोंदविला.