कासार्‍याच्या बाजारपेठेत शेतकर्‍यांनी फेकला कांदा ; गावात तणावपूर्ण शांतता

0

धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांची धाव ; कांद्याला भाव नसल्याने केंद्र शासनाचा निषेध

साक्री- कांद्याला भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकर्‍यांनी तालुक्यातील कासारे गावाच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कांदा फेकून संताप व्यक्त केला. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली. शेतकर्‍यांच्या या आंदोलनामुळे गुरूवारी सकाळी 11 वाजता खासदार डॉ.हिना गावित यांच्या उपस्थितीत होणारा गॅस वाटप कार्यक्रम दुपारी दीड वाजेपर्यंत होवू शकला नाही. दरम्यान, शेतकरी आंदोलनाची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त गावात लावण्यात आल्याने गावात तणावपूर्ण शांतता आहे.

केंद्र शासनाचा केला निषेध
कासारे परीसरातील शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली होती मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी गुरुवारी सकाळी गावाच्या मुख्य बाजारपेठेत कांदा फेकून केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत संताप व्यक्त केला. या घटनेची पोलिस दलाला माहिती कळताच मोठ्या प्रमाणावर गावात बंदोबस्त लावण्यात आला आहे तर सकाळी खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत लाभार्थींना गॅस वाटप कायक्रम होणार होता मात्र त्यापूर्वीच शेतकर्‍यांनी रूद्रावतार धारण केल्याने कार्यक्रम होतो वा नाही याकडे लक्ष लागले आहे.