साक्री- तालुक्यातील कासारे गावाच्या ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीजवळ खेळत असताना स्वीच रूम जवळील वायरला हात लागल्याने वैष्णवी पवार या पाच वर्षाच्या चिमुरडीचा शॉक लागून मृत्यू झाला. याबाबत साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शॉक लागल्याने मृत्यू
कासारे गावात शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कासारे गावातील गणेशपुर रोड परिसरात वैष्णवी शरद पवार वय 5 वर्ष ही मुलगी खेळत होती. खेळत असतांना तेथील ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहिरीच्या स्वीच रूम जवळील वायरला वैष्णवीचा हात लागला.यावेळी विद्युत शॉक लागल्याने वैष्णवी ही बेशुद्ध झाली. ग्रामस्थांच्या मदतीने वैष्णवीला तात्काळ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून वैष्णवी पवार हिला मयत घोषित केले. या रावसाहेब दामू पवार यांच्या खबरीनुसार साक्री पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.