कास तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ

0

सातारा : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मोसमी पाऊस राज्यात सक्रिय होण्याची चिन्हे असून आतापर्यंत झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कास तलावातील पाणी पातळीत दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल सात फूट पाणी वाढले आहे. त्यामुळे सातारकरांची चिंता मिटली आहे. कास परिसरात पडत असलेल्या दमदार पावसामुळे तलावात बारा फूट पाणीसाठा झाला. कास तलावाचे दोन्ही व्हॉल्व्हच्यावर पाणी आले असून, पाणीपातळीत वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली.

मागील दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसाने कास तलावाच्या पाणीपातळीत एक इंचाने वाढ झाली होती. मान्सूनने सलग दोन दिवस हजेरी लावल्यामुळे पातळीत वाढ झाली नसली तरी दिवसभर वातावरणात गारवा निर्माण होऊन तलाव परिसरातील जमिनीत ओलावा निर्माण होत होता. दरम्यान, पाणीपातळी खालावतच चालली होती. सध्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने पठाराच्या सड्यावरून पाणी वाहत तलावाला मिळत असल्याने पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे.

तलाव शंभर टक्के भरू शकते
कास तलाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कास तलाव भरेल व जनतेची पाण्याची चिंता मिटेल, अशी आशावाद व्यक्त होत आहे. शहर व जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे तलावातील अवघ्या तीन दिवसांत सात फुटांनी पाणी वाढले आहे. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत बारा फुटांवर आला आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर लवकरच कास तलाव शंभर टक्के भरू शकते. त्यामुळे सातारकरांची चिंता वर्षभरासाठी मिटण्याच्या मार्गावर आहे.