काहींना मिळणार डच्चू तर काहींना बढती

0

मुंबई (राजा आदाटे) : राज्यातील भाजपच्या काही मंत्र्यांना बढती मिळणार असून, काहींना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. नुकतीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्वतः मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि आमदारांच्या कामाचा आढावा घेणारी बैठक मुंबईत घेतली होती. त्या झाडाझडती बैठकीत प्रत्येकाने दिलेल्या माहितीची उलट तपासणी सुरू झाली असून, चांगले काम करणार्‍यांना बढती दिली जाईल, तर कामचुकारांना नारळ दिला जाणार आहे. भाजपच्या गोटातील वरिष्ठ मंत्र्याने ही माहिती दिली. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे. मात्र, हे राष्ट्रपतीपदाच्या निवडीनंतर होणार आहे. सध्या त्या कामाचे मूल्यमापन सुरू आहे.

पुराव्यासहित कार्यअहवाल झाले होते सादर
गेल्या 15 जून आणि 16 जून रोजी ते मुंबईत आले होते. वर्षा बंगल्यावर प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचा लेखाजोखा त्यांनी घेतला असून, प्रत्येकाने पुराव्यासहित आपला कार्यअहवाल सादर केला आहे. त्यामध्ये शिवार संवादपासून ते केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची यादी प्रत्येकाने जोडली आहे. त्याचे फोटो, व्हिडिओ, बातम्यांची कात्रणे, माफी बाबींचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिलेल्या जबाबदार्‍या आणि त्याचे फलित काय, याचा लेखाजोखाही घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा शेरा महत्त्वाचा ठरणार
राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायती अशा टप्प्याटप्प्याने निवडणुका पार पडल्या. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना निश्‍चित टार्गेट देण्यात आले होते. म्हणून जबाबदार्‍याचे वाटपही त्यांनीच केले होते. त्यावेळी पक्षांतर्गत राजकारण कारणार्‍यांचे तपशील मुख्यमंत्री फडणवीस यांनी तयार ठेवले आहेत. म्हणूनच प्रत्येकाच्या लेखाजोख्यात त्यांचा शेरा महत्त्वाचा ठरणार आहे, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. त्यात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांचे नाराजीचे शेरे जास्त असल्याचे बोलले जात आहे.

पुढील लोकसभा निवडणुकीसाठी ही पूर्वतयारी
अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2019च्या निवडणुकांची ही तयारी असल्याचे मानले जाते. त्यावेळी त्यांना कसलीही रिस्क नको म्हणून हा आढावा आणि फेरबदल करण्याची तयारी आत्तापासूनच सुरू असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशा सक्त सूचना सर्वांना दिल्या होत्या. ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आढळणार नाही त्यांना नारळ दिला जाईल, असेही त्यांनी बजावले होते. त्याची अंमलबजावणी आता होणार आहे.

पुढील दोन वर्षांचे टार्गेट आत्ताच
कामगिरी तपासली गेल्यावर जबाबदार्‍या निश्‍चित करण्यात येणार असून, त्यांच्यावरील कामाचे पुढील दोन वर्षांचे टार्गेट आत्ताच ठरवण्यात येणार आहे. त्याप्रमाणे जबाबदार्‍या यावेळी निश्‍चित केल्या जाणार आहेत. निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांना योग्य परिस्थिती निर्माण करण्याचे हे प्रयत्न असल्याचे बोलले जाते.