काहींवर पाऊस तर काहींवर दुष्काळ!

0

बंगळूरू । जगात सर्वाधिक चर्चित असलेल्या आयपीएलच्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत काही खेळाडूंवर अनपेक्षित रीत्या कोट्यावधी रुपयांचा पाउस पडला तर काही खेळाडूंवर बोलीच न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंग्लंडच्या बेन स्टोक्स ने सर्वाधिक 14.50 कोटी घेत बाजी मारली. स्टोक्सला आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी सर्वच संघ मालकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी आज, (सोमवार) बंगळूरमध्ये क्रिकेटपटूंचा लिलाव झाला. एकूण 551 क्रिकेटपटूंसाठी बोली लागणार आहे. करारानुसार हा अखेरचा लिलाव असल्यामुळे फ्रँचाइजी किती खर्च करतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. सकाळी साडेनऊ वाजता लिलाव प्रक्रियेला सुरूवात झाली. मार्टिन गप्तीलच्या लिलावाने कार्यक्रमाला सुरूवात झाली, पण गप्तीलवर कोणत्याही संघाने बोली लावलीच नाही. त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून वीरेंद्र सेहवागने इंग्लंडच्या इऑन मॉर्गनला दोन कोटींच्या बोलीसह संघात दाखल करून घेतले. भारताच्या इशांत शर्मावर 2 कोटींची पायाभूत किंमत ठेवण्यात आली असतानाही त्यात एकाही संघाने रस दाखवला नाही. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टवर 2 कोटींची बोली लावून कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला ताफ्यात दाखल करून घेतले.

अष्टपैलू खेळाडूंकडे फ्रँजाइजी मालकांचा कल

फ्रँचाइजींना खर्च करण्यासाठी कोट्यवधी रुपये असले, तरी फलंदाज, गोलंदाज यापेक्षा अष्टपैलू खेळाडूंकडे फ्रँजाइजी मालकांचा कल अधिक होता. बंगळूर आणि हैदराबाद यांच्यात दहाव्या मोसमाची पहिली लढत होणार असली, तरी स्टार हॉटेलमध्ये मैदानाबाहेरचे लिलावाचे नाट्य रंगले. लिलाव करण्यासाठी प्रसिद्ध असणारे वेल्सचे रिचर्ड मेडले यांनी लिलावाचा हातोडा सांभाळला. लिलावातून 75 खेळाडूंची निवड होणार असली, तरी यासाठी तब्बल 352 क्रिकेटपटू उपलब्ध होते. आयपीएल लिलावाच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा हरहुन्नरी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने येत्या आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी करार संपुष्टात आणला आहे. ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मिचेल स्टार्क यांनी सहमतीने आगामी आयपीएल हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. आयपीएल खेळाडूंच्या नियमावलीतील नियम क्रमांक 41 अनुसार हा करार संपुष्टात आला आहे,’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली.

इशांतसह अनेक दिग्गजांना बोलीच नाही!

आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी अनेक दिग्गज खेळाडूंना बोलीच लागली नाही. त्यामुळे ते अनसोल्ड अर्थात त्यांची खरेदीच झाली नाही. खरेदी न झालेल्या खेळाडूंच्या यादीत इशांत शर्मा, इरफान पठाण, पृथ्वी शॉ यासारख्या अनेक दिग्गजांची नावे आहेत. या खेळाडूंच्या बोली न लागल्याने अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत. यात देखील महत्वाचे भारतीय खेळाडू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बोली न लागलेल्या खेळाडूंमध्ये म्रान ताहीर, कायले अ‍ॅबॉट, प्रज्ञान ओझा, ब्रॅड हॉग, लक्षाण संदाकान, सोधी, नेथन कल्टर, दिनेश चंदिमल, जॉनी बेअरस्टो, बेन डंक, सीन अ‍ॅबॉट, इरफान पठाण, सौरव तिवारी, रॉस टेलर, अ‍ॅलेक्स हेल्स, फेज फैजल, जेसन रॉय, मार्टिन गप्टील यांसारख्या नावाजलेल्या खेळाडूंचा देखील समावेश आहे.

मिल्स 12 कोटींच्या बोलीसह दुसर्‍या स्थानी

भारतीय संघाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत अतिशय हुशारीने गोलंदाजी केलेला इंग्लंडचा टायमल मिल्स याच्यावरही चांगली बोली लागली. टायमल मिल्सला 12 कोटींच्या बोलीसह बंगळुरूने आपल्या ताफ्यात दाखल केले. दुसरीकडे 2 कोटींची पायाभूत किंमत ठेवण्यात आलेला भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यावेळी ‘अनसोल्ड’ राहिला. याशिवाय, चेतेश्वर पुजारा, मनोज तिवारी, आर.पी.सिंग या खेळाडूंना यावेळी कोणीच भाव दिला नाही. लिलावाच्या सकाळच्या सत्रात आतापर्यंत भारतीय खेळाडूंमध्ये कर्ण शर्मा याच्यावर सर्वाधिक 3 कोटी 20 लाखांची बोली लागली आहे. तर अनिकेत चौधरीला 2 कोटींचा भाव मिळाला आहे. मागील पर्वात तब्बल साडेआठ कोटींची बोली लागलेला पवन नेगी याच्यावर यावेळी केवळ 1 कोटींची बोली लागली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नेगीला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. बंगळुरूत सुरू असलेल्या या लिलावात आठ संघ 350 हून अधिक खेळाडूंमधून 148.33 कोटी रुपयांचा वर्षाव करून खेळाडूंची निवड सुरू आहे. यामध्ये एकूण 28 परदेशी खेळाडूंना चमूत स्थान देण्याची मुभा देण्यात आली आहे.