विभागप्रमुखांच्या गैरहजेरीतील अतिरिक्त जबाबदारीवर तोडगा
अतिरिक्त पदभाराची जबाबदारी निश्चित
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील संबंधित विभागाचे विभागप्रमुख रजा, सुट्टी आणि प्रशिक्षण किंवा अन्य काही कामामुळे रजेवर असल्यास प्रशासकीय कामकाजात अडचणी येतात. तसेच प्रत्येकवेळी अतिरिक्त पदभाराचा वेगळा आदेश पारित करावा लागतो. त्यासाठी अधिकार्यांच्या रजा काळातील अतिरिक्त पदभारांचे नियोजन करण्यात आले आहे. विभागप्रमुखाच्या रजेच्या काळातील जबाबदारी अधिकार्यांवर निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेत सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी व कायदा सल्लागार ही वरिष्ठ अधिकार्यांची पदे आहेत. या पदावर कार्यरत असलेले अधिकारी रजा, सुट्टीवर असतात; अथवा प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांच्या विभागातील कामकाजाचा खोळंबा होतो. प्रदीर्घ कालावधीच्या सुट्टीकरिता गेलेल्या अधिकार्याचा अतिरिक्त पदभार अन्य अधिकार्यांकडे सोपविण्यासाठी महापालिका आयुक्तांना प्रत्येकवेळी स्वतंत्र आदेश निर्गमित करावे लागतात. ही बाब वारंवार होत आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतंत्र आदेश काढण्याऐवजी सुट्टीवर असलेल्या अधिकार्यांचा अतिरिक्त पदभार अन्य कोणत्या अधिकार्यांकडे सोपविण्यात येईल, याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
अशी आहे जबाबदारी
आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहाय्यक आयुक्त रजेवर असल्यास मध्यवर्ती भांडार विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे असणार अतिरिक्त पदभार, नागरवस्ती व विकास योजना विभागाचे सहाय्यक रजेवर असल्यास कर संकलन विभागाचे सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त कसंकलन विभाग यांच्याकडे जबाबदारी असणार. स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाचे सहाय्यक रजेवर असल्यास एलबीटीच्या प्रशासन अधिकार्याकडे अतिरिक्त पदभार असणार आहे. मध्यवर्ती भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त रजेवर असल्यास सह, सहाय्यक आयुक्त यांच्याकडे अतिरिक्त पदभार असणार आहे. भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त रजेवर असल्यास मध्यवर्ती भांडार विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे अतिरिक्त पदभार असणार आहे. झो.नि.पु. विभागाचे सहाय्यक आयुक्त रजेवर असल्यास विभागाच्याच प्रशासन अधिकार्याकडे अतिरिक्त पदभार असणार आहे. आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी रजेवर असल्यास आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे पदभार असणार, माहिती व तंत्रज्ञान विभाग मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी रजेवर असल्यास माहिती व तंत्रज्ञान अधिकार्याकडे पदभार असणार आहे.
यांच्या गैरहजेरीतील अधिकारी
माहिती व जनसंपर्क अधिकारी सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त रजेवर असल्यास भूमी आणि जिंदगी विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे पदभार असणार आहे. कायदा विभागाचे कायदा सल्लागार रजेवर असल्यास कायदा अधिकार्याकडे पदभार असणार आहे. निवडणूक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या गैरहजेरीत सह आयुक्तांकडे अतिरिक्त पदभार असणार आहे. तसेच जनगणना विभाग अधिकार्याच्या गैरहजेरीत देखील सह आयुक्तांकडे पदभार असणार आहे. उद्यान विभागाचे मुख्य उद्यान अधीक्षक रजेवर असल्यास उद्यान अधीक्षकांकडे अतिरिक्त पदभार असणार, अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रजेवर असल्यास क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे अतिरिक्त जबाबदारी असणार, सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त रजेवर असल्यास आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे पदभार असणार आहे. क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या गैरहजेरीत विभागाच्या प्रशासन अधिकार्याकडे पदभार असणार, नागरी सुविधा केंद्राचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी रजेवर असल्यास माहिती व तंत्रज्ञान अधिकार्याकडे अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. अभिलेख कक्षाचे सह आयुक्त रजेवर असल्यास कर संकलनच्या प्रशासन अधिकार्याकडे पदभार असणार आहे.
क्षेत्रीय अधिकारी असे असतील
‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी रजेवर असल्यास कार्यालयातील प्रशासन अधिकार्याकडेच पदभार असणार. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी रजेवर असल्यास ‘ग’ क्षेत्रीय अधिकार्याकडे जबाबदारी असणार. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी रजेवर असल्यास ‘इ’ च्या क्षेत्रीय अधिकार्याकडे जबाबदारी असणार आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकार्याच्या गैरहजेरीत ‘ह’च्या क्षेत्रीय अधिकार्याकडे पदभार असणार आहे. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय अधिकारी रजेवर असल्यास ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिकार्याकडे अतिरिक्त पदभार असणार. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी रजेवर असल्यास ‘अ’ क्षेत्रीय अधिकार्याकडे अतिरिक्त पदभार असणार आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी रजेवर असल्यास ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्याकडे अतिरिक्त पदभार असणार आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकार्याच्या गैरहजेरीत ‘ड’च्या क्षेत्रीय अधिकार्याकडे ‘ह’चा अतिरिक्त पदभार असणार आहे. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पारित केला आहे.