प्रभाग ४ मधील नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया; बळीरामपेठेत हॉकर्सचे अतिक्रमण
जळगाव– प्रभाग क्रमांक 4 मधील काही भागात सुविधा नसल्यामुळे नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. गटारी असूनही सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे दिसून आले. साफसफाई होत नसल्याचेही नागरिकांनी सांगितले.चौघुले प्लॉट परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.सार्वजनिक शौचालयाची स्थिती अतिशय बिकट आहे.काही भागात मुलभूत सुविधा तर काही भागात सुविधांची वानवा असल्याचे दिसून आले.विशेषत: या प्रभागातील बाजारपेठेत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
प्रभाग क्रमांक 4 संमिश्र वस्तीचा परिसर आहे. या प्रभागात शनिपेठ,दालफळ,चौघुले प्लॉट,ओक मंगल कार्यालय परिसर,बळीराम पेठ,नानकनगर,जोशीपेठ,मारोती पेठ,बालाजी पेठ,रामपेठ,विठ्ठलपेठ,रथ चौक,बागवान गल्ली,भावसार मढी या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात दैनिक जनशक्तिच्या टिमने पाहणी करुन नागरिकांच्या समस्या, प्रशासनाकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.दरम्यान,प्रभागात पाहणीअंती काही भागात विकासकामे दिसून आलीत.तर काही भागात विकासकांचा अभाव असल्याचे दिसून आले. किमान मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या.
चौघुले प्लॉटमधील रस्त्यांची दुरवस्था
प्रभाग क्रमांक 4 मधील चौघुले प्लॉटमध्ये पाहणी केली असता या परिसरात रस्त्यांची दुरावस्था झालेली असल्याचे चित्र दिसून आले.तसेच काही ठिकाणी असलेल्या गटारी जीर्ण झाल्याने गटारीतील सांडपाणी रस्त्यांवर वाहत होते. गटारींची सफाई होत नसल्याने अक्षरश: तुंबलेल्या दिसून आल्या आहेत. साफसफाईची तर कायमच ओरड असल्याचेही नागरिकांनी सांगितले. येथील नगरसेवक दखल घेतात मात्र मनपा प्रशासनाकडून फारसे सहकार्य मिळत नाही.वारंवार तक्रारी करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा सूर नागरिकांच्या बोलण्यातून उमटला.
बाजारपेठेत अतिक्रमण
प्रभाग क्रमांक 4 मधील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याचे दिसून आले. बळीरामपेठेत भाजीपाला विक्रेत्यांमुळे अतिक्रमण होत आहे.त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने या ठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी होते.तसेच सांयकाळी भाजीपाला विक्रेते,फळ विक्रेते खराब असलेला माल त्याच ठिकाणी रस्स्यावर टाकून देत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते.परिणामी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपा प्रशासन अतिक्रमण निर्मुलन कारवाईचा केवळ दिखाऊपणा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
भावसारमढीमध्ये पथदिवेे बंदच
भावसारमढीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद आहेत.पथदिवे सुरु करण्यासाठी मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.मात्र अद्यापही दुरुस्त न केल्यामुळे परिसरातील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. गटारी तुंबत असल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे नागरिकांनी सांगितले.तर काही नागरिकांनी बर्यापैकी विकासकामे झालेली असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.तसेच दुषीत पाणीपुरवठा होत असून मनपा प्रशासनाने उपाययोजना करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.