तुमचा प्रोब्लेम तरी काय आहे?; मोदींचा विरोधकांना सवाल

0

नवी दिल्ली: देशातील काही पक्ष आणि त्या पक्षातील नेते असे आहेत जे नेहमी देशाच्या भल्यासाठी केलेल्या कामाला विरोध करतात, जनतेचे भले व्हावे अशी त्यांची कधीही इच्छा नसते अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेससह विरोधी पक्षांवर निशाणा साधला. ‘नमामी गंगे मिशन’ अंतर्गत ६ मेगा प्रकल्पाच्या अनावरण प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली.

जेव्हा भारताच्या पुढाकाराने जग आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत होता, त्यालाही विरोध करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला. जगात याचे कौतुक झाले परंतु भारतात याला विरोधच केला. विरोध करणाऱ्यांनी आजपर्यंत स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली नाही असेही मोदींनी सांगितले.

चार वर्षापूर्वी भारताच्या बहादूर सैनिकांनी सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, त्याचेही पुरावे मागण्यात आले. भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविण्यापेक्षा मनोबल कमी करण्याचेच काम विरोधकांकडून होत असल्याचे खंत मोदींनी व्यक्त केले. सैन्य दल मजबूत करण्यासाठी फ्रांस सोबत राफेल करार झाला, त्यालाही विरोध झाला. चांगल्या कामालाही विरोध करण्याची परंपरा कायम असल्याचे सांगत मोदींनी विरोधकांना चांगलेच फटकारले.

केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे, मात्र काही पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून माथी भडकविण्याचे काम करत असल्याचे मोदींनी सांगितले.