पणजी । नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकीतील निकालांनंतर, सत्तेत येण्याची अजिबात शक्यता नसताना भाजपने संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करून गोव्यात राजसोपान मिळवला. पण, आता गोव्यात परत येण्याची मन की बात पर्रिकरांनी बोलून दाखवली. काश्मीरच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला, असे खूद्द पर्रिकरांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्याचवेळी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात बोलताना, जाधव यांच्याबाबतीत पाकिस्तान धोकादायक खेळ खेळत असल्याचे पर्रिकर म्हणाले.
गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मुलाखात देताना पर्रिकरांनी अनेक मुद्दांना हात घातला. यावेळी भावुक होत पर्रिकर म्हणाले की, काश्मीरच्या मुद्यामुळे संरक्षण मंत्रीपद सोडले. दिल्लीमध्ये काम करताना दडपण असायचे त्यामुळे गोव्यात परतणे चांगले याची खुणगाठ मनाशी बांधली होती. काश्मीर मुद्द्यावर तोडगा निघणे खूप कठीण आहे. त्यासाठी दीर्घकालीन योजना बनवायला लागेल. काश्मीर मुद्द्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा, कारवाई करून तो प्रश्न सोडवता येईल. पाकिस्तानने कितीही गमजा मारल्या तरी भारताने कारवाईला सुरुवात केल्यावर त्याचा मुकाबला करण्याची ताकद पाकिस्तानात नाही. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात पर्रिकर म्हणाले की, आपला देश शांतिप्रिय आहे. पण आम्हाला चिथवू नका. त्यामुळे पाकिस्तानने जाधव यांना परत पाठवावे. पाकिस्तानने जाधव यांचे अपहरण केले आहे. जाधव इराणमध्ये होते. इराणमधून तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून पाकिस्तानात आणले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत पाकिस्तानाला सडेतोड उत्तर दिले आहे. जाधव यांना फाशी दिल्यास भारत गप्प बसणार नाही. त्यांच्या घरात घुसून मारण्याची ताकद भारताकडे आहे.
गोव्यामध्ये भाजपचेस सरकार स्थापन करण्याबाबत पर्रिकर म्हणाले की, अपयश लपवण्यासाठी काँग्रेस आता काहीही आरोप करत आहे. प्रसिद्धीमाध्यमांचा आसरा घेत काँग्रेस आपले अपयश लपवत आहे.