‘किंगमेकर’ आचरेकर

0

‘डोंड वॉक अ‍ॅज यु आर क किंग, वॉक अ‍ॅज यु डोंड केअर हू इज द किंग’ हे जगप्रसिध्द वाक्य फार कमी लोकांना कमी पडते. ‘क्रिकेटचा देव’ घडविणारे ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना हे वाक्य तंतोतंत लागू पडते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आचरेकर यांचे बुधवारी वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर, बलविंदर संधू, चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, संजय बांगर, रमेश पोवार अशा दिग्गज खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले होते. आचरेकर यांच्या निधनामुळे क्रिकेटविश्वात पोकळी निर्माण झाली आहे. आचरेकर नसते तर कदाचित तेंडुलकर घडलाच नसता. सचिन तेंडुलकर विना भारतिय क्रिकेट ही संकल्पना मनाला न पटणारीच आहे. हिर्‍याची पारख जोहरीच असते, क्रिकेट विश्‍वातला हिरा नव्हे तर कोहीनूर हिरा आचरेकरांमुळेच भारताला मिळाला आहे.

‘क्रिकेटचा देव’ म्हणवणार्‍या सचिन तेंडुलकरला घडवण्यात आचरेकर यांचा मोलाचा वाटा आहे. रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म 1932 मध्ये झाला. ते मूळचे सिंधुदुर्गातल्या मालवणमधील आचरा गावचे. त्यांनी 1943 साली खेळायला सुरुवात केली. 1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबचं प्रतिनिधित्व केले. त्यांनी यंग महाराष्ट्र दख, गुलमोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट संघांचेही प्रतिनिधित्व केले. त्यांनी केवळ एक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आहे. 1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता. पण प्रत्यक्ष क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. यांनी आपल्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत अनेक क्रिकेटपटू घडवले. याच मुळे 1990 मध्ये आचरेकर यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले. 2003 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडा महर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. 2010 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच वर्षी ‘स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड’तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ते स्वत: फारसे खेळले नसले तरी ते क्रिकेट विश्‍वातले किंगमेकर म्हणून ओळखले जातात. त्यांची पारखी नजर ज्या दिवशी तेंडुलकरवर पडली त्याच दिवसापासून सचिनचा मास्टरब्लास्टर होण्याकडे प्रवास सुरु झाला होता. सचिन अकरा वर्षांचा असतांना मोठा भाऊ अजित तेंडुलकर हेच एक दिवस सचिनला आचरेकर सरांकडे घेवून आले होते. हा क्षण सचिनच्या कारकिर्दीतला निर्णायक क्षण होता. अकरा-बारा वर्षांचा असताना सरांच्या स्कूटरवरबसून सचिन प्रॅक्टिस मॅच खेळायला जायचा. शिवाजी पार्क, आझाद मैदान असे एकामागोमाग एक मॅचेस खेळायचे. सचिनला जास्तीत जास्त मॅचेस खेळायला मिळाव्यात म्हणून सर अख्ख्या मुंबईभर सचिनला घेऊन जायचे, कारण त्यांच्या पारख्या नजरेने सचिनच्या बॅटने भविष्यात होणारी जागतिक विक्रमे आधीच बघितली होती. त्यावेळी आचरेकर नेटप्रॅक्टीस दरम्यान स्टंपवर एक रुपयाचा कॉईन ठेवायचे. जर शेवटपर्यंत सचिन आऊट झाला नाही तर तो शिक्का सचिनला मिळायचा. असे सचिनने 13 कॉईन मिळवले होते. आचरेकर यांची शिस्त व चिकाटी लष्कराप्रमाणे होती. त्यांच्या आठवणीतला एक किस्सा खूप प्रेरणादायक आहे. एकदा सचिन प्रॅक्टीस मॅचमध्ये न खेळत त्यांच्या वरिष्ठ संघाला प्रोत्साहित करण्यासाठी पोहचला यावर आचरेकर प्रचंड नाराज झाले. स्वत: दुसर्‍यांसाठी टाळ्या वाजविण्यापेक्षा असं काहीतरी कर की ज्यामुळे इतरांनी तुझ्यासाठी टाळ्या वाजविल्या पाहिजेच, अशी शिकवण त्यांनी सचिनला दिली. खेळाडूला केवळ शारिरीकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही कणखर व्हायला हवे, ही आचरेकरांची शिकवण होती. यातूनच तेंडुलकर व विनोद कांबळीसारखे हिरे भारतीय क्रिकेट विश्‍वाला मिळाले. शारदाश्रमकडून खेळतांना सचिनची विनोद कांबळीबरोबरची 662 रन्सची विश्‍वविक्रमी भागीदारी सर्वांच्या लक्षात आहे. ही मॅच जेंव्हा सुरू होती तेव्हा दिलिप वेंगसरकर मुंबई रणजी टीमचे कॅप्टन होते. माजी कॅप्टन वासू परांजपे त्यांना आझाद मैदानावर ती मॅच बघायला घेऊन गेले. वेंगसरकर यांची जिमखाना मॅच सुरू होती. पण परांजपे यांनी ती मॅच सोडून त्यांना सचिनची बॅटिंग बघण्याची गळ घातली. सचिनने दोन दिवस खेळून 326 रन केले होते. त्यानंतर सचिनने दहा ओव्हर ओपनिंग बॉलर म्हणून बॉलिंग केली. म्हणजे आधी दोन दिवस बॅटिंग, मग 40 ओव्हर्सची बॉलिंग. आणि मॅचच्या पूर्वी आणि नंतर आचरेकर सरांच्या शिस्तीप्रमाणे नेट्स, असा 14 वर्षांच्या सचिनचा त्या टेस्ट दरम्यानचा कार्यक्रम पाहून वेंगसरकर हैरण झाले. त्याकाळात सचिन एकामागून एक शिखरे पादाक्रांत करित होता मात्र आचरेकरांनी त्याचे कधीही कौतुक केले नाही. याबाबतचा खुलासा खुद्द सचिननेच केला होता. गेल्या 29 वर्षात सरांनी मला कधीही ‘वेलप्लेड’ असे म्हटले नाही. कारण कौतुकाने हुरळून जाऊन मी मेहनत करणे थांबवेन, असे त्यांना वाटायचे. 16 नोव्हेंबर 2013 रोजी आपल्या निवृत्तीच्या वेळी सचिनने आपल्या संदेशात आचरेकर सरांच्या योगदानाचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता, शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना सरांना स्टँड्समध्ये पाहणं अतिशय आनंद आणि समाधान देणारा क्षण आहे. सर्वसाधारणपणे ते माझ्या मॅचेस घरी टीव्हीवर पाहतात. हा माझा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. आता मी यापुढे खेळणार नाही. त्यामुळे आता ते मला ‘वेलडन’ म्हणू शकतात, असे सचिन भावूक होऊन म्हणाला होता. माझ्या कारकिर्दीला योग्य वळण देण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे. तुमचा ऋणाईत आहे, अशा शब्दांत सचिनने आचरेकर सरांप्रति कृतज्ञता व्यक्त केली होती. यावरुन गुरु-शिष्याचे प्रेम दिसून येते. जसे दुसरे द्रोणाचार्य होवू शकत नाही तसे दुसरे आचरेकर देखील होवू शकत नाही. आचरेकरांच्या अत्यंसंस्कारवेळी सचिन रडला, यावरुन दोघांमधील नाते किती घट्ट होते याची जाणीव होते. आज किंगमेकर आचरेकर हे हयात नाही मात्र त्यांनी यशस्वी खेळाडू होण्यासाठी दिलेली शिकवण कायम आहे. त्यांनी शिकवलेल्या याच मार्गाने इतरांनी मार्गक्रमण केले तर अजून दुसरा सचिन तयार होवू शकतो व ही देखील आचरेकरांना आगळीवेगळी श्रध्दांजली ठरु शकते. केवळ भारतीय क्रिकेट विश्‍वालाच नव्हे तर संपुर्ण जगला अमुल्य देणगी देणार्‍या व क्रिकेटच्या देवाचा देव असणार्‍या रमाकांत आचरेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.