किटकनाशक प्राशनाने आत्महत्त्येचा प्रयत्न

0

जळगाव । रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल आराम गेस्ट हॉऊस येथे गेल्या दोन दिवसांपासून वास्तव्यास असलेल्या अर्थात थांबलेल्या प्रौढाने आज मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास किटकनाशक फवारणीचे औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेल कर्मचार्‍यांचा प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रौढास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, प्रौढाची प्रकृति चिंताजनक असल्याचे समजते.

हॉटेल कर्मचार्‍यांनी रूग्णालयात केले दाखल
मुक्ताईनगर तालुक्यातील पारंभी येथील धोंडू शिवराम पाटील (वय-45) हे काही दिवसांपूर्वी शहरात कामानिमित्त आले होते. यानंतर ते रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल आराम गेस्ट हॉऊस येथे जनरल रूममध्ये गेल्या दोन दिवसांपासून थांबले. परंतू आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक त्यांना उलट्या झाल्या. त्या नंतर हॉटेलच्या बाहेर आल्यानंतर देखील त्यांना आणखी उलट्या झाल्या. हॉटेलमधील कर्मचारी प्रदिप वाणी व वसीम पटेल यांना धोंडू शिवराम पाटील यांनी किटकनाशक औषध प्राशन केल्याचे कळताच त्यांनी ताराचंद कोष्टी यांच्या रिक्षातून जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेले. हॉटेल मालक स्वप्निल राणे हे देखील रूग्णालयात आले होते. डॉक्टरांनी पाटील यांच्यावर उपचार केले व त्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या मोबाईवरून त्यांचा मुलगा राहूल याला संपर्क साधून पाटील यांनी किटकनाशक औषध प्राशन केले असले असल्याची माहिती दिली. दरम्यान, पाटील यांनी किटकनाशक प्रमाणाच्या बाहेर प्राशन केले असल्याने जिल्हा रूग्णालयात उग्र दर्प येत होता.