“किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा”; भाजपाचा टोला

मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आगामी ‘राष्ट्रपती’पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा चेहरा पुढे करावा यासाठी लॉबिंग करत आहेत. यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. “किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा” असा टोला भातखळकरांनी लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच राष्ट्रपती हा भाजपाचाच उमेदवार होईल असं देखील म्हटलं आहे.
“शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा सोडलेली दिसते. त्याच्यामुळे अत्यंत हास्यास्पद हालचाली सुरू आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक विचारात घेतली तरी लोकसभा आणि राज्यसभेत भाजपाचं बहुमत आहे, त्यामुळे राष्ट्रपती हा भाजपाचाच उमेदवार होईल. त्यांना फक्त यातून प्रसिद्धीची ऊर्जा मिळते, याशिवाय त्यातून काही साध्य होणार नाही” असं म्हणत अतुल भातखळकर यांनी हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार म्हणून शरद पवार यांचा चेहराच योग्य आहे असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. या विधानावरून अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची भातखळकर यांनी ट्विटरवरून खिल्ली उडवली आहे. ते म्हणाले की, कायमस्वरूपी भावी पंतप्रधान कोण हे महाभारतातले योद्धे संजय राऊत यांनी आधी निश्चित करावे. कधी ते उद्धव ठाकरेंच्या कोपराला गुळ लावतात, तर कधी शरद पवारांच्या, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.