किती शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली?

0

तब्बल 103 आमदारांची लेखी प्रश्नांद्वारे सरकारकडे विचारणा

नागपूर : राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीवर संशय व्यक्त करत, तब्बल 103 आमदारांनी लेखी प्रश्न देऊन सरकारकडे किती शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली आहे, याची माहिती विचारली आहे. यापैकी अल्पवधीच्या या अधिवेशनात किती आमदारांना प्रत्यक्षात सभागृहात हा प्रश्न विचारता येईल, हा मोठाच प्रश्न आहे. सद्या कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांनीही आपल्या लेखी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला असून, तशी नोटीस सरकारला पाठविली आहे. या अधिवेशनात जेवढे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत, त्यात सर्वाधिक प्रश्न हे शेतकरी कर्जमाफीशी संबंधित असल्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाच्या सूत्राने दिली आहे. अधिवेशनाच्या प्रत्येक सत्रात सरासरी 12 ते 20 आमदारांनी सरकारला हाच प्रश्न प्रामुख्याने विचारला आहे.

विधानसभेतील अर्ध्या आमदारांचा सरकारवर अविश्वास?
कृषी कर्जमाफीची आकडेवारी मागणारे विधानसभेतील 103 आमदार असून, त्यांचा सरकारवर विश्वास नसल्याचे भासते. एकूण 250 आमदारांची संख्या पाहाता, तब्बल 40 टक्के आमदारांचा सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवर विश्वास नसल्याचे दिसून आल्यानेच त्यांनी लेखी प्रश्नाद्वारे माहिती मागितली आहे. या आमदारांत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम व मनसेच्या आमदारांचा समावेश आहे. 38 आमदार हे मंत्री असल्याने (23 कॅबिनेट, 15 राज्यमंत्री) ही संख्या वजा केली तर जवळपास 50 टक्के आमदारांनी कर्जमाफीवरून सरकारला सवाल उपस्थित केलेला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सरकार माहिती देत नसल्याचा आक्षेप घेतला आहे. कर्जमाफी योजनेची सद्यस्थिती काय आहे, हे माहित करून घेण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करत आहोत, मात्र आपल्यालाही माहिती दिली जात नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.

राज्यातील एकूण 43 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम पोहोचली आहे. योजनेची पूर्तता योग्य पद्धतीने सुरू आहे. संपूर्ण योजना पूर्णत्वास गेल्याशिवाय सरकार थांबणार नाही. कर्जमाफी योजनेमध्ये एकाही शेतकर्‍याचा अर्ज ’रिजेक्ट’ केलेला नाही. त्रुटी असलेले अर्ज शेतकर्‍यांकडून पुन्हा भरून घेतले जात आहेत.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

कर्जमाफीच्या योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना हे नाव काढून टाका आणि मुख्यमंत्री फडणवीस शेतकरी अपमानित योजना असे नाव द्या.
– धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते विधानपरिषद