यावल : तालुक्यातील किनगाव येथील तरुणा सोबत पैसे घेत लग्न करून फसवणूक करणार्या त्या पसार झालेल्या नववधूस पोलिसांनी अटक केली आहे. यावल न्यायालयात तिला हजर केले असता मंगळवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
फसवणूक प्रकरणी दाखल आहे गुन्हा
धनजंय हिरालाल सोनार या तरूणाचा यशवंत उर्फ दादु विजय पाटील (रा.सांगवी खुर्द) यांची मनलेली बहिण सरीता प्रकाश कोळी (रा.अंजाळे) हिच्या सोबत विवाह निश्चित झाला. या विवाहाकरीता सव्वा लाख रूपये द्यावे तसेच लग्नाचा खर्च मुलाने करावा, असे ठरवण्यात आले व ठरल्याप्रमाणे 85 हजार रुपये देण्यात आले. उर्वरीत रक्कम नंतर देणार होते तर 14 डिसेंबर 2021 रोजी देहू आंळदी पुणे येथील अलंकापुरी मंगल कार्यालय, पुणे येथे लग्न झाले व लग्नाच्या सात दिवसानंतर यशवंत उर्फ दादु विजय पाटील हा किनगाव येथे आला व वधू मुलगी सरीता कोळी हिला तिच्या आईला भेटण्यासाठी घेवुन जातो असे सांगुन घेवुन गेला तेव्हा पासुन तो परत आला नाही. तेव्हा या दोघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात होता. यात नववधू सरीता हिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिला मंगळवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.