किनगावजवळ भरधाव टीप्पर झाडावर आदळला ; चालकासह तिघे जखमी

0

जखमींना कटरने पत्रा कापून काढले बाहेर ; जळगावात उपचार

यावल- वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव टीप्परवरील ताबा सुटल्याने वाहन झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह दोेघे जखमी झाले. हा अपघात अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर बुधवारी रात्री उशिरा झाला. अपघातानंतर जखमी टीप्परच्या कॅबिनमध्ये फसल्याने त्यांना कटरने पत्रा कापून बाहेर काढावे लागले. जखमींवर जळगाव येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास वाळूने भरलेला टीप्पर (एम.एच.19 झेड 7878) चालक सचिन कोळी (रा.फुफनगरी, ता.जळगाव) हा अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गाने यावलकडे आणत असताना किनगाव जवळील हॉटेल मनमंदिरसमोर चालकाचा भरधाव वाहनावरील ताबा सुटून वाहन लिंबाच्या झाडावर धडकल्याने वाहनाचे कॅबीन चक्काचूर झाली. चालक सचिन कोळीसह सागर कैलास पवार (वय-19 रा. फुफनगरी) व अमोल भिल (रा.आमोदा, ता.जळगाव) हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील, चंद्रकांत चौधरी, प्रमोद पाटील, संजय पाटील, प्रशांत पाटीलसह नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जेसीबी बोलवून रस्त्यावर विखुरलेली वाळू गोळा करून गॅस कटरच्या मदतीने कॅबिनमध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात काढून जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले.