यावल : तालुक्यातील किनगाव येथील तीन वृद्ध महिलांच्या खून प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या किनगाव येथील सिरीयल किलरला पुन्हा नव्याने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने तीन वृद्धांचे खून करून त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिण्यांसह रोकड लांबवली होती. पोलिस कोठडीत आरोपीने हा मुद्देमाल कुणाला विकला? याची माहिती घेतली जाणार आहे.
सिरीयल किलरला पुन्हा पोलिस कोठडी
किनगाव, ता.यावल येथील जळगाव रस्त्यावर आत्माराम नगरातील मराबाई सखाराम कोळी (75) या वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी बाळु उर्फ मुकुंदा बाबुलाल लोहार (30, रा.किनगाव बुद्रुक) यास अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी यावल न्यायालयाने 1 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली व मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्या.एम.एस.बनचरे यांनी पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपीने वृध्द महिलेच्या अंगावरील काढलेली चांदीची पाटली कोणास दिली वा विक्री केली आदींची माहिती पोलिस कोठडीदरम्यान घेणार आहेत. अधिक तपास पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद गोसावी, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील करीत आहेत.