यावल- तालुक्यातील किनगाव येथे अतिसाराने दोन जण दगावल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली तर गावातील 40 वर रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नेमका प्रकार कशामुळे घडला? हे सांगण्यास आरोग्य विभागाने असमर्थता दर्शवली आहे. गावातील नागरीकांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू असल्याने गावात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. दिलीप गेंदा साळुंके (50) व नाना माधव साळुंखे (38) अशी मयतांची नावे आहेत.
आरोग्य केंद्राला आले यात्रेचे स्वरूप
किनगाव येथे रविवारी सकाळपासूनच ग्रामस्थांना उलट्यांसह जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवातीला काही लोक दाखल झाले मात्र दुपारपर्यंत 40 वर लोकांना हा त्रास जाणवल्यानंतर आरोग्य यंत्रणा खळबडून कामाला लागली. नाना साळुंखे यांना पहाटेपूर्वी आरोग्य केंद्रात आणले होते तर तेथून जळगाव येथे हलविण्यात आले त्यानंतर सायंकाळी दिलीप गेंदा साळुंके दाखल करण्यात आले मात्र सायंकाळी उभयंतांचा मृत्यू ओढवला. रविवारी रात्री नऊ वाजेच्या आरोग्य केंद्रातून अनेक रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णांमध्ये किनगाव खुर्दचे सरपंच भुषण पाटील, सुरेश सोनवणेंसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व महिलांचा समावेश आहे.