गावात तणावपूर्ण शांतता ; यात्रोत्सवानिमित्त कडेकोट बंदोबस्त
यावल- तालुक्यातील किनगाव येथे प्रवेशद्वारावर नाव टाकण्याच्या कारणावरून सोमवारी रात्री वाद झाल्यानंतर एका गटाने उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र धुडकु पाटील (41) यांना मारहाण केल्यानंतर गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते तर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षकांसह अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. मंगळवारी गावाचा यात्रोत्सव असल्याने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रवेशद्वारावर नाव टाकण्यावरून वाद
अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्ग किनगाव गावातूनच जातो तर या रस्त्यावर सुमारे दहा वर्षांपूर्वी काँक्रीट करून प्रवेशद्वार बनवण्यात आले होते. या प्रवेशद्वारावर काही महापुरुषांची चित्र रेखाटण्यात आली होती तर मंगळवारी किनगावचा यात्रोत्सव उत्सव समितीच्या वतीने या प्रवेशद्वारावर स्टीलने तयार केलेले शब्द तयार करून त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर नाव टाकले जात असताना एका गटाने त्याबाबत हरकत घेतल्याने दोन गटात वाद विकोपाला गेला. एका गटातील जमावाने उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र धुडकु पाटील (41) मारहाण केल्याने त्यांच्या हाताचे हाड मोडले गेले. जखमी अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांनी रात्री उशिरा धाव घेत गावात शांतता निर्माण केली. दरम्यान, रात्री गेटवर टाकण्यात आलेले नाव पोलिसांकडून काढण्यात आले.