अज्ञात चोरट्यांनी मंदिरातच चोरी केल्याने ग्रामस्थ संतप्त : साडेतीन हजारांची चिल्लर चोरट्यांनी लांबवल्याचा संशय
यावल : तालुक्यातील किनगाव येथील मारुती मंदिरात चोरट्यांनी प्रवेश करीत दानपेटी फोडल्याने गावात खळबळ उडाली. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. दानपेटीतून सुमारे साडेतीन हजारांची रक्कम चोरीस गेल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाईची मागणी भाविक ग्रामस्थांनी केली आहे.
चोरीनंतर ग्रामस्थ संतप्त
दानपेटीतील रक्कम चोरट्यांंनी फोडल्याचे वृत्त किनगाव बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावात पसरताच मंदिर परीसरात मोठा जमाव जमला. घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जमावाला शांतता राखण्याचे आवाहन केले. दरम्यान, चोरट्यांचा माग काढण्यासाठी जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.