किनगावात वयोवृद्धेवर हल्ला : चांदीचे कडे काढताना घटना

यावल : हातातील चांदीचे कडे काढताना गुन्हेगाराने वयोवृद्धेवरच हल्ला केल्याची घटना तालुक्यातील किनगावात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या वृद्ध महिलेस किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून जळगावात हलवण्यात आले.

अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध
किनगाव येथील जळगाव रस्त्यावर आत्माराम नगर असून त्यात मराबाई सखाराम कोळी (75) ही वृद्ध महिला एकटीच राहते. सोमवारी रात्री महिला घरी एकटी असताना तिच्या हातातील चांदीचे दोन कडे पाहून आरोपीने वृद्धेला मारहाण करीत बेशुद्ध केले आणि तिच्या हातातील एक कडा काढला व दुसरा चांदीचा कळा काढत असतांना शेजारील महिलेचा चाहूल आल्याने हा भामटा आपले साहित्य सोडून पसार झाला. महिलेने संजय सयाजीराव पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्यासह बबलु कोळी, पप्पू विनायक पाटील, डॉ.योगेश पालवे, किरण महाजन, संजय वराडे सह आदी दाखल झाले. जखमी महिलेला तातडीने किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर जळगाव येथे हलवण्यात आले. यावलचे प्रभारी पोलिस निरीक्षक आयपीएस अधिकारी आशीत कांबळे, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व पथकाने धाव घेत माहिती जाणून घेतली. घटनास्थळी आढळलेल्या साहित्यावरून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. फैजपूरचे डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी देखील किनगावात भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली.