किनगाव ग्रामपंचायतीवर पुन्हा महिलांचा हंडा मोर्चा

0

ग्रामपंचायतीवर धडक ; खंडित विजेमुळे संताप

यावल :- तालुक्यातील किनगाव येथील ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक पाच व सहामध्ये पाणीप्रश्‍न गंभीर झाल्यानंतर रणरागिणींनी नुकताच ग्रामपंचायतीविरुद्ध हल्लाबोल मोर्चा काढल्याची घटना ताजी असताना पाणी देऊन काही तासांचा अवधी होत नाही तोच विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पाणी न आल्याने महिलांनी पुन्हा शुक्रवार, 2 रोजी सकाळी नऊ वाजता पुन्हा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला. बंद पथदिवे, गटारींचा प्रश्‍न आदी समस्या मांडण्यात आल्या.

सदस्यांनी द्यावेत राजीनामे
वारंवार ग्रामपंचायतीत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने सदस्यांनी राजीनामे द्यावेत, असा पवित्रा मुकेश पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घेतला. शिवकालनी, आत्माराम नगर, रामराव नगरात पाणीप्रश्‍न गंभीर झाल्याने व्यथा मांडण्यात आल्या. मुख्य पाईन लाईनवर अनधिकृत कनेक्शन बंद करण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली. विस्तार अधिकारी साळुंके यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा प्रसंगी यावलचे सहाय्यक निरीक्षक् अशोक अहिरे, विस्ताराधिकारी सोळंके, ग्रा.वि.आ.बी.पी.यहिदे, सदस्य रमेश चौधरी यांनी नागरीकांना शांत करुन लवकरच आठ दिवसांत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान, निवेदनावर राजेंद्र पाटील यांच्यासह उज्ज्वला पाटील, अशोक कोळी, राजु लोहार, संतोष पाटील, जगन्नाथ महाजन, मुकेश माळी, सुधीर महाजन, सतीश महाजन यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.