किनोद ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक करणारे 11 ट्रॅक्टर पकडले

0

जळगाव, – तालुक्यातील किनोद येथे तापी नदी पात्रातून अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा करणारे 11 ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पकडले. नेहमी होणार्‍या या प्रकाराकडे महसूल विभागाकडून सोपस्कररित्या कानाडोळा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
किनोद गावाजवळ असलेल्या तापी नदी पात्रातून नेहमी चोरट्या पध्दतीने वाळू उपसा केला जात असतो. वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर गावातून जात असल्याने ग्रामस्थांना देखील त्रास सहन करावा लागतो. सोमवारी सकाळी 8.25 वाजेच्या सुमारास गावातील सरपंचासह पोलीस पाटील व इतर ग्रामस्थांनी थेट तापी पात्रात धाव घेतली. त्याठिकाणी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे 11 ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पकडले.

तीन ट्रॅक्टर विना नंबरचे
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर क्रमांक एमएच.19.एपी.9971, एमएच.19.5140, एमएच.46.ए.6305, एमएच.19.बी.4505, एमएच.19.बीजी.775, एमएच.19.बीजी.0574, एमएच.19.बीजी.1201, एमएच.19.सीवाय.1442 यासह तीन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ग्रामस्थांनी पकडले.

महसूल विभागाकडून पंचनामा
माहिती मिळताच तहसीलदार वैशाली हिंगे यांच्यासह कर्मचार्‍यांनी नदीपात्र गाठले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील हजर होते. महसूल कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून ग्रामस्थांच्या सह्या घेण्यात आल्या आहे.तापी पात्रातून वारंवार अवैधरित्या वाळू उपसा होत असताना देखील महसूल विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.