किन्हवलीच्या कानडी गावातील विवाहितेच्या हत्येमागील गुढ पोलिसांसाठी बनले आव्हान

0

किन्हवली : शहापूर तालुक्यात किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानडी गावात पाच दिवसांपूर्वी एक विवाहितेची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाच्या तपासात मुख्य आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी किन्हवली पोलिसांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. शहापूर तालुक्यात किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानडी गावात बुधवार, 9 ऑगस्ट रोजी शेतावर कामासाठी गेलेल्या संध्या गणेश निमसे (37) या विवाहितेचा दगडाने डोके ठेचून खून करण्यात आला होता. या महिलेचा 20 एप्रिल 2016 रोजी झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील 11 संशयित आरोपींना घटनेच्या मध्यरात्रीच व दुसर्‍या दिवशी 4 संशयिताना ताब्यात घेतले होते परंतु तपासात ठोस असे काहीच निष्पन्न होत नसल्याने पोलीसही संभ्रमात आहेत, त्यामुळे अन्य काही मार्गाने सुगावा लागतोय का या दृष्टिने सध्या तपासाची चक्रे फिरत आहेत.

15 अधिकार्‍यांचे पथक तळ ठोकून
स्थानीय गुन्हे अन्वेषणच्या 15 अधिकार्‍यांचे पथक किन्हवली पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहे. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील हे सुद्धा जातीने या तपासात लक्ष घालत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे पोलीस उप विभागीय अधिकारी विशाल ठाकूर, किन्हवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण फेगडे हे दिवस रात्र माग काढून मुख्य आरोपीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

मृत संध्याच्या झाला होता विनयभंग
हत्या झालेल्या संध्याच्या विनयभंग खटल्याचा निकाल शहापूर न्यायालयात प्रलंबित होता. येत्या 18 ऑगस्टला निकालाची तारीख होती परंतू त्या अगोदरच तिची हत्या झाली. या घटनेतील संशयित आरोपींकडून गुन्ह्याची उकल होईल असे वाटले होते परंतु तसे न झाल्याने पोलिसांपुढे मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे. याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.