किन्हवलीत पाणीटंचाई

0

किन्हवली । शहापूर तालुक्यातील शेलवली(बां) येथील पाणीपुरवठा योजनेचे विद्युत रोहित्र एक महिन्यापूर्वी जळाल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने वारंवार तक्रारी करूनही वीज अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपसरपंच संजय बांगर व शिवसेना शाखाप्रमुख काळूराम बांगर यांनी केला आहे. सुमारे पंधराशे लोकवस्ती असलेल्या शेलवली (बां) या ग्रामपंचायतीतील नागरिकांना काळू नदीशेजारील विंधन विहिरीतून 7.5 अश्‍वशक्ती क्षमतेच्या मोटरद्वारे पाणीपुरवठा होतो.

यासाठी 100 के.व्ही.चे वीज रोहित्र बसविण्यात आले आहे. एक महिन्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने वीज पडून रोहित्र निकामी झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विजेचे रोहित्र नव्याने बसवून देण्याबाबत वीज वितरणाचे किन्हवली येथील कनिष्ठ अभियंता प्रकाश मराठे, उपविभागीय कार्यालय शहापूरचे उपअभियंता ए. कटकवार यांच्याकडे वारंवार खेटा घालूनही अधिकारी दूर्लक्ष करत असल्याचा आरोप उपसरपंच संजय बांगर व शिवसेना शाखाप्रमुख काळूराम बांगर यांनी केला आहे. येथील महिलांना एक किलोमीटर अंतरावरील आदिवासी पाड्यातून पायपीट करून पाणी आणावे लागत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे.