किन्हवली । माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस किन्हवलीसह सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका बजावून अध्यापनाचे कार्य केले. किन्हवलीच्या शहा विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या तब्बल 100 विद्यार्थ्यानी शिक्षकांची भूमिका यशस्वीपणे पार पाडून 1350 विद्यार्थ्यांना शिकविले. शिक्षक काय असतो? वर्ग नियंत्रण काय व कसे असते? हा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यांनी आपला अनुभव कथन केला. शिल्पा दिनकर, प्राची देसले या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीनी शिक्षक कवी गोपाळ वेखंडे यांना त्यांच्या साहित्यावर आधारित साहित्य सागर, गोपाळ वेखंडे’ हे हस्तलिखीत भेट दिले. या कार्यक्रम प्रसंगी विद्याप्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक खंडू विशे व सर्व शिक्षक उपस्थित होते.