किन्हवली : किन्हवली येथील पशुवैद्यकीय उपचार केंद्राच्या दालनात मंगळवारी दुग्ध उत्पादक शेतकरी आणि पशुपालक यांच्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना किन्हवली व विरबॅक पशुऔषध कंपनी यांच्या सहयोगाने जंतनिर्मूलन व गोचिड निर्मूलन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.
यावेळी पशुवैद्यकीय उपचार केंद्राचे सहाय्यक विस्तार अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी दूध उत्पादक शेतकर्यांना काही मार्गदर्शक तत्वे सांगितली. यामध्ये गायी, म्हशीने अधिक पाणी पिण्यासाठी खुराकात मीठ टाकणे, प्रजननासाठी खनिज मिश्रण खाऊ घालणे, नियमित लसीकरण करुन घेणे व आपल्या गायी, म्हशींचा गोठा स्वच्छ ठेवणे इत्यादीचा समावेश होता. या शिबिराचे औचित्य साधून न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा संस्थेचे प्रतिनिधी निलेश प्रभू यांनी गायी म्हशीच्या पशुविमाबाबत माहिती दिली. उपस्थित शेतकर्यांना जंत व गोचिड निर्मूलन औषधे तसेच काही शेतकर्यांना बक्षीस म्हणून कॅलशियम किटचे वाटप करण्यात आले.