किन्हवली । किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून संघर्ष पत्रकार संघाचे तालुका सचिव पत्रकार अंकुश सातपुते हे 27 सप्टेंबर रोजी दवाखान्याच्या ओसरीवर बसून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. विविध मागण्यांसाठी वरिष्ठांना अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी करूनही वाटाण्याच्या अक्षता लावल्याच्या निषेधार्थ या आंदोलनात शहापूर तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना, विविध प्रसिद्धी माध्यमे, सामाजिक संघटना सहभागी होऊन पाठींबा देणार आहेत.
शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ संघर्ष पत्रकार संघाचे तालुका सचिव पत्रकार अंकुश सातपुते हे येत्या 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत किन्हवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ओसरीवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत.किन्हवली प्रा.आ.केंद्राच्या कार्यक्षेत्रात असणार्या अस्नोली उपकेंद्रात शासकीय निवासस्थानी रुग्णसेविका वास्तव्यास राहत नाही. किन्हवली प्रा.आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कायमस्वरूपी वेळेवर हजर न राहता वेळेअगोदर घरी जाऊन राजेशाही जीवन जगणारे डॉक्टर व कर्मचारी ,तसेच पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांची होत असलेली हेळसांड अशा अनेक समस्यांचे किन्हवली आरोग्य केंद्र आगार बनले आहे.