किन्हवली बसस्थानकाला खासगी वाहनांचा विळखा

0

शहापूर । शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील बसस्थानक परिसरात खासगी वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूककोंडीची समस्या बिकट झाली असून, सतत उभ्या असणार्‍या खासगी वाहनांमुळे महामंडळाच्या बस फिरवण्यासही जागा मिळणे कठीण झाले आहे. शहापूर-शेणवा-सरळगाव मार्गावर किन्हवली हे तालुकास्तरीय गाव असून, किन्हवलीचे बसस्थानक रस्त्यावर आहे. आजूबाजूच्या सुमारे 75 गावपाड्यांत जाणार्‍या महामंडळाच्या बस याच किन्हवली स्थानकातून रवाना होत असतात. दररोज शहापूर, मुरबाड, डहाणू, आदी आगारातून दिवसभर 80 ते 100 बसच्या फेर्‍या या ठिकाणी होत असतात. शिवाय रोज हजारो विद्यार्थी, शेकडो नोकरदार, ग्रामस्थ आजूबाजूच्या परिसरातून किन्हवलीत शिक्षण, नोकरी, व्यापारासाठी येत असतात. त्यामुळे किन्हवली बसस्थानकात मोठी गर्दी होत असते.

प्रवाशांनी फिरवली पाठ
माल घेऊन येणारे एनपी ट्रक, टेम्पो, खासगी जीप, व्यापारी व गिर्‍हाइकांची वाहने याच ठिकाणी कशीही लावली जात असल्याने येणार्‍या बस फिरवण्यासही जागा नसते. काही वेळेस सोगाव फाट्यावर जाऊन बस फिरवून आणावी लागते. त्यामुळे शाळकरी मुलं, वयोवृद्ध नागरिक, महिला यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खासगी वाहनांमुळे बस फिरवताना वारंवार किरकोळ अपघात होतात. परिणामी, बस थांबवण्यासाठी व फिरवण्यासाठी पुरेशी जागा मिळावी याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बसस्थानक हलवण्याचाही प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता. मात्र, हे ठिकाण मुख्य बाजारपेठेपासून दूर असल्याने प्रवाशांनी प्रतिसाद दिला नाही.

कारवाई करण्याची मागणी
पूर्वी बसस्थानकाच्या निवारा शेडमध्ये बसून एसटीचा एक कर्मचारी वाहतूक नियंत्रण करत होता. त्यामुळे काही प्रमाणात खासगी वाहनावर नियंत्रण होते. मात्र, खासगी वाहनांचे मोफत पार्किंग बनलेला बसस्थानक परिसर मोकळा करण्यासाठी शहापूर आगार प्रशासन व किन्हवली पोलिसांचा वाहतूक नियंत्रण विभाग यांनी संयुक्त कारवाई करण्याची मागणी वजा प्रतिक्रिया बसप्रवासी व्यक्त करत आहेत.