शहापूर । शहापूर तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागाच्या किन्हवली येथील दवाखान्यास ठाणे, पालघर आणि पुणे ह्या जिल्ह्याच्या उपआयुक्तांनी भेट देऊन पशुसंवर्धनाचे नाविन्यपूर्ण दिशादर्शक प्रकल्प व राज्यातील पहिले शेतकरी वाचनालयाची पाहणी केल्याने हे उपक्रम प्रकाशझोतात आले आहेत.शहापुर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या किन्हवली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणि तालुक्यात डॉ.दिलीप धानके यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाने सुरू केलेल्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाचे ठाणे व पालघर जिल्हा उपायुक्त डॉ. रायकवार व जिल्हा कृत्रिम रेतन अधिकारी डॉ. कावळे तर पुणे जिल्ह्यचे महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथील उपायुक्त डॉ. शेख यांनी विशेष तपासणीचे निमित्ताने पशुवैद्यकीय दवाखाना किन्हवली येथे भेट दिली. यावेळी महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे येथील उपायुक्त डॉ. शेख यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची पाहणी करुन हा किन्हवली पॅटर्न राज्यभर राबवता येऊ शकतो असे मत व्यक्त केले.
शेतकरी वाचनालयाची पाहणी
या भेटीत ठाणे, पालघर ह्या जिल्ह्याचे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. रायकवार यांनी सहाय्यक पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी शेतकर्यांसाठी राबविलेल्या गांडुळ खत प्रकल्प, चारा बाग, देशी गायीचे जीवामृताने तयार केलेली फुलबाग, वेलवर्गीय भाजीपाला व शेतकरी वाचनालयाची पाहणी केली. याप्रसंगी डॉ. रायकवार यांनी सांगितले की पशुवैद्यकीय दवाखाना किन्हवलीचे आवारात बेरोजगार युवक महिला व आदिवासी तरुणांसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसायाची अत्यल्प शुल्कात उपलब्ध असलेली शासकीय शिबीरे आयोजित करण्याची सुचना केली.
डिजीटल लायब्ररीची सूचना
या शेतकरी वाचनालयात पशुधन ऐश्वर्य, शेतकरी मासिक, बळीराजा, लोकराज्य मासिक व रोज येणारे दैनिक अॅग्रोवन पाहून अत्यंत समाधान व्यक्त करून वाचनालयात डिजीटल लायब्ररी उभी करण्याची सुचना दिल्या. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारातील पडीक शेडमध्ये देशी कोंबडीपालनचे मीनी मॉडेल उभे करावे. तसेच किन्हवली व परिसरातील गावात कृषी उत्पन्न बाजार समितीचे मदतीने शेळ्या व कोंबड्याचा आठवडा बाजार सुरु करावा म्हणजे स्थानिक शेतकरी व महिला यांना चांगला रोजगार उपलब्ध होईल असे सांगितले. तर पशुवैद्यकीय विभागात केलेला आदर्शवत बदल व तांत्रिक कामात मागील वर्षापेक्षा तीनशे टक्के वाढ झाल्याचे पाहून तीनही आयुक्तांनी यशस्वी उपक्रम राबविणारे सहाय्यक विस्तार अधिकारी डॉ. दिलीप धानके यांचे कौतुक केले.