किन्ही गावातून चोरट्यांनी लांबवल्या म्हशी

भुसावळ : तालुक्यातील किन्ही गावात रमेश गिरधर सुरवाडे यांच्या खळ्यातून दोन म्हशी चोरीस गेल्याची घटना 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शेतकर्‍याने आपल्या शेजारील गावांमध्ये म्हशींचा शोध घेतला मात्र त्या न मिळाल्याने तालुका पोलिस ठाण्यात म्हशींच्या चोरीची नोंद करण्यात आली. किन्ही, ता.भुसावळ येथील रमेश सुरवाडे यांच्याकडे 15-20 म्हशी आहेत. ते गावातील गुरांच्या पाणी पिण्याच्या हौदाजवळ आपल्या म्हशी बांधतात. या ठिकाणी रात्री कुणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन, खुटेंचा दोर कापून अज्ञान चोरट्यांनी 80 हजार रुपयांच्या दोन म्हशी लंपास केल्या. त्यांनी याबाबत शेजारी खडका, शिवपूर कन्हाळा या गावांमध्ये जाऊन म्हशींचा शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश राठोड करीत आहे.