पुणे । राजेश वाधवान समूह आणि हृतिक रोशन यांच्या सहमालकीची इंडियन सुपर लीगमधील फ्रँचायझी एसी पुणे सिटी संघाने आयएसएलच्या चौथ्या मोसमासाठी अव्वल आक्रमक खेळाडू किन लुईस, अव्वल बचावपटू वायने वाझ, लालचुमंविया फनाई, मध्यरक्षक आदिल खान, बलजीत सिंग आणि जुवेल राजा या खेळाडूंचा समावेश करून आपला संघ अधिक मजबूत केला आहे.
एक अव्वल आघाडीवीर असलेल्या किन लुईस याने गेल्या मोसमात दिल्ली डायनामॉज संघाकडून खेळताना 11 सामन्यांमध्ये 4 गोल केले होते. तसेच, एक उत्कृष्ट मध्यरक्षक म्हणून गेल्या मौसमात चर्चिल ब्रदर्सकडून प्रसिध्दी मिळविलेल्या आदिल खानने याआधी डेंपो, मोहन बगान आणि स्पोर्टिंग क्लब दी गोवा या संघाकडून आपल्या 14 वर्षाच्या कारकिर्दीत चमकदार कामगिरी बजावली आहे. अत्यंत महत्वाच्या अशा मध्यरक्षक फळीमध्ये बलजीत सिंग सहाणी आणि जुवेल राजा संघाला मजबूती देतील. बलजीत सिंगने गेल्या मोसमात चेन्नई एफसीचे प्रतिनिधित्व केले होते. जुवेल राजा ऍटलिटको दी कोलकत्ता संघाकडून खेळला होता.