किफायतशीर दराच्या विमानसेवेमध्ये या कंपन्याचा नव्याने सहभाग

0

नवी दिल्ली-किफायतशीर दरात आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा देणाऱ्या जगभरातील आघाडीच्या पाच कंपन्यांमध्ये इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या भारतीय कंपन्यांचा समावेश झाला आहे. ‘ग्लोबल फ्लाइट प्रायसिंग रिपोर्ट’च्या मते या यादीत एअर इंडिया एक्स्प्रेस दुसऱ्या तर, इंडिगो पाचव्या स्थानी आहे.

२०० मोठ्या प्रवासी विमानकंपन्यांची तुलना

या यादीमध्ये अन्य दोन भारतीय कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये जेट एअरवेज १२ व्या आणि एअर इंडिया तेराव्या स्थानी आहे. हा अहवाल मेलबर्न येथील ‘रोम टू रियो’ या वेबसाइटने तयार केला आहे. या अहवालानुसार प्रति किलोमीटर प्रवासाला येणाऱ्या खर्चाच्या आधारे जगभरातील २०० मोठ्या प्रवासी विमानकंपन्यांची तुलना करण्यात आली आहे. एअर एशिया एक्स या विमानकंपनीने यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

आखाती देश आणि सिंगापूरला जोडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसचा प्रति किलोमीटरसाठी सरासरी प्रवासी खर्च ०.०८ डॉलर येत असून, इंडिगोला प्रति किलोमीटरसाठी सरासरी प्रवासी खर्च ०.१० डॉलर येत असल्याचे आढळून आले आहे. देशांतर्गत शहरांव्यतिरिक्त आखाती देश, बँकॉक, कोलंबो आणि काठमांडू या शहरांमध्ये इंडिगोतर्फे किफायतशीर दरामध्ये सेवा दिली जाते. किफायतशीर दरात आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा देणाऱ्या जगभरातील कंपन्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या एअर एशियाला प्रतिकिलोमीटरसाठी ०.०७८ डॉलर खर्च येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अहवाल प्रसिद्ध 

‘रोम टू रियो’च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार चालू वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये इकॉनॉमी श्रेणीच्या हवाई दरांचे विश्लेषण करण्यात आले. मेमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालानुसार जगभरातील सर्वांत स्वस्त पाच प्रवासी विमान कंपन्यांमध्ये चार कंपन्या आशिया खंडातील आहेत. टॉप पाच कंपन्यांमध्ये इंडोनेशिया एअर एशिया आणि प्रायमेरा एअरलाइन्स या अन्य दोन कंपन्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या शिवाय एतिहाद, रेयान एअर, क्वांटास, वाओ एअर आणि व्हर्जिन ऑस्ट्रेलिया आदी कंपन्यांचा टॉप १०मध्ये समावेश करण्यात आला आहे. यादीतील टॉप १० मध्ये एकाही ब्रिटिश आणि अमेरिकन कंपनीचा समावेश झालेला नाही.