अंबरनाथ । राज्य सरकारने रिक्षा परवान्यांना पुढील पाच ते दहा वर्षे स्थगिती देण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी केली आहे. रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढणार्या रिक्षांमुळे प्रचंड वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वाहतूक व्यवस्था, रिक्षा स्टँड, रिक्षाचे भाडे शिवाय परवाना नूतनीकरण यांचे कोणतेही नियोजन न करता परवाने देण्यात आल्याने रिक्षांचे प्रमाण वाढत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह रिक्षाचालकांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारे रिक्षांचे परवाने तातडीने थांबवण्याची मागणी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अंबरनाथ शहरातील पूर्व आणी पश्चिम भागातील स्टेशन परिसरात दररोज सकाळ, संध्याकाळ स्टँडवरील रिक्षाचालक सोडून इतर अनेक रिक्षावाले बेकायदेशीररीत्या आपल्या रिक्षा रस्त्याच्या आजूबाजू किंवा मध्ये उभ्या करून फेरीवाले ओरडतात त्याप्रमाणे पॅसेंजरला ओरडून आपल्या रिक्षात बसवतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा तर होतोच, शिवाय स्टँडवरील आणि सदर रिक्षाचालकामध्ये पॅसेंजर बसवले म्हणून भांडणे होतात, पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात, बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात स्टेशनपासून रिक्षांच्या रांगा या एक किलोमीटरपर्यंत लागलेल्या असतात. त्यामुळे सर्वच रस्ते हे रिक्षांनी भरून गेलेले असतात. नागरिकांना या रिक्षाचालकांकडून मोठा मानसिक त्रास होत असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.
बोगस कागदपत्रांच्या आधारेही परवाने घेतल्याचे निष्पन्न
बेसुमार परवाने देण्यात आलेले असल्याने कोणाला परवाने दिले जात आहेत याची शहानिशा नीट होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने घेतलेले आढळलेले आहे. या परवाने वाटपात स्थानिक भूमिपुत्र डावलले गेले असल्याचे दिसून आले आहे. रिक्षांना परवाने देताना येणार्या रिक्षासाठी शहरात त्याप्रमाणात कोणतेही पायाभूत सुविधांचे नियोजन झालेले दिसत नाही. रिक्षा आहेत मात्र रिक्षाचालक उपलब्ध होत नाहीत. रिक्षा वाढत आहेत आणि त्या तुलनेत रिक्षाचालकांनाही व्यवसाय होत नाही. परिणामी, रिक्षाचालकांनी घेतलेले कर्ज वेळेवर फेडू शकतील का, हासुद्धा गहन प्रश्न आहे. याचा विपरीत परिणाम कर्जबाजारी रिक्षाचालकांवर होऊन बेरोजगारी वाढून त्याचा परिणाम गुन्हेगारीवर होण्याची शक्यता आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केली आहे.