जळगाव- तालुक्यातील उजाड कुसुंबा येथे पत्र्यांवरील पाणी घरावर पडल्याच्या कारणावरुन एका तरुणाला लोखंडी सळईने शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मारहाण झाली. या घटनेतील जखमी तरुणावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.
उजाड कुसुंबा येथील विनोद शब्बीर तडवी हा तरुण वाहन चालक आहे. नमीन शरीफ तडवी यांनी त्यांच्या घराच्या पत्र्यांवरील पाणी विनोद तडवी यांच्या घरावर पडले, याबाबत जाब विचारला असता वाद उफाळला. नमीन शरीफ तडवी व त्याचा भाऊ सोनू शरीफ तडवी यांनी लोखंडी आसारीने विनोद तडवी याला मारहाण केली. या घटनेत विनोद तडवी जखमी झाल्याने त्यास खासगी दवाखान्यात दाखल केले. यासंदर्भात विनोद तडवी याने फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस नाईक संतोष पवार करीत आहेत.