जळगाव। किरकोळ कारणावरून झालेल्या वादात शेळगाव येथील दाम्पत्याच्या डोक्यात लाकडी रॉडने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी 6 वाजता घडली. संबधित जखमी दाम्पत्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मारहाणीत दाम्पत्याच्या डोक्याला तसेच हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर नातेवईकांनी देखील जिल्हा सामान्य रूग्णालयात गर्दी केली होती.
ग्रामस्थांनी भांडण सोडवून जखमी दाम्पत्यास रुग्णालयात केले दाखल
शेळगाव येथे संतोष काशिनाथ कोळी (वय 37) हे पत्नी छायाबाई, आई लिलाबाई, दोन मुले व एक मुलगी यांच्यासोबत राहतात. दरम्यान, पाणी भरण्याच्या वादातून शेजारी राहणार्या एका कुटुंबियांसोबत त्यांचा किरकोळ वाद झाला होता. सोमवारी सकाळी 6 वाजता शेजारी राहणार्या चौघांनी थेट कोळी यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करणार्यांपैकी एकाने त्यांचे डोळे झाकले तर इतर तीघांनी लाथाबुक्क्यांनी त्यांच्या छातीवर मारहाण केली. एकाने लाकडी दांडा त्यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तर त्यांच्या पत्नी छायाबाई आवरण्यासाठी पुढे आल्यानंतर त्यांनाही लाकडी दांड्याने मारहाण केली आहे. गावातील इतर लोकांनी ही मारहाण रोखून जखमी दाम्पत्याला तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. कोळी यांच्या डोक्यात दांडा मारल्यामुळे टाके मारण्यात आले. तर छायाबाई यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. नशिराबाद पोलिसांनी सामान्य रूग्णालय गाठुन जखमी कोळी यांचा जबाब घेतला होता.