पुणे । नाशिक येथे कांदा व्यापार्यांवर आयकर विभागाने छापे टाकल्यामुळे तसेच कांद्याचे दर उतरतील या भीतीने मार्केट यार्डात मागील तीन-चार दिवसांपासून आवक वाढली आहे. तसेच इजिप्तमधून झालेली कांद्याची आयात केली जात आहे. नेहमीच्या तुलनेत दीडपट आवक होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दोन दिवसात कांद्याच्या भावात किलोमागे 2 रुपयांनी घसरण झाली आहे. कांद्याला घाऊक बाजारात 12 ते 15 रुपये भाव मिळत आहे. मात्र किरकोळ बाजारात कांद्याचे भाव तेजीत असून 30 ते 40 रुपये किलो भावाने कांद्याची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.
इजिप्तमधून कांद्याची आयात
कांद्याच्या वधारलेल्या दरामुळे केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली. इजिप्त येथून कांदा आयात केला. हा कांदा अद्याप पुण्यातील बाजारपेठेत दाखल झाला नाही. तरी मुंबइतील बाजारात कांदा आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव घाऊक बाजारात उतरण्यास सुरुवात झाली. घाऊक बाजारात 20 रुपये किलोपर्यंत कांद्याचे भाव उतरले होते. दुसरा उपाय म्हणून सरकारच्या आदेशानुसार आयकर विभागाने मागील आठवड्यात नाशिक येथील कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापार्यांवर छापा टाकत कारवाई केली. त्यामुळे कांद्याचे भाव आता उतरतील, या शक्यतेने साठवणूक केलेल्या व्यापार्यांनी आणि शेतकर्यांनी माल मोठ्या प्रमाणात बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.
शेतकरी कंगाल, तर किरकोळ व्यापारी मालेमाल
घाऊक बाजारात कांद्यास प्रती किलोस 12 ते 15 रुपये भाव मिळत आहे. वाहतूक खर्च, हमाली वगळता शेतकर्यांना फारसे पैसे मिळत नाही. तर दुसरीकडे किरकोळ व्यापारी मात्र मालेमाल होत आहेत. घाऊक बाजारात खरेदी केलेल्या भावापेक्षा दुप्पटीहून अधिक भावाने कांद्याची विक्री करत आहेत. मोठा नफा मिळवत आहेत. किरकोळ विक्रीच्या भावावर नियंत्रण करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याचा किरकोळ विक्रेत्यांना फायदा होत आहे. त्यामुळे शेतकरी कंगाल, तर किरकोळ व्यापारी मालेमाल अशी अवस्था निर्माण झाली आहे.
घाऊक बाजारात 2 रुपयांची घसरण
मागील आठवड्यात कांद्याला घाऊक बाजारात 12 ते 17 रुपये भाव मिळत होता. आवक वाढल्यामुळे त्यामध्येही घाऊक बाजारात दोन दिवसात कांद्याच्या भावात प्रती किलो 2 रुपयांनी घसरण झाली आहे. बाजारात 12 ते 15 रुपये किलो भावाने कांद्याची विक्री होत आहे. किरकोळ बाजारात मात्र कांद्याचे भाव अद्याप चढेच आहेत. प्रती किलो 30 ते 40 रुपये भावाने कांद्याची विक्री होत असल्याचे दिसून येते.
नाशिकमधील बंदचा परिणाम
नाशिक येथे साठा केलेल्या कांदा व्यापार्यांवर आयकर विभागाने मागील आठवड्यात छापे टाकले. त्यामुळे तेथील व्यापार्यांनी 24 सप्टेंबरपर्यंत संप पुकारला आहे. त्यामुळे छाप्यांनंतर जरी दोन दिवस आवक वाढली, तरीही रविवारी मात्र आवक घटली. रविवारी 100 ट्रक कांद्याची आवक झाली. रविवारचा विचार केल्यास नेहमी सरासरी 130 ते 140 ट्रकची आवक होत असते. त्यामुळे नाशिक बाजारातील बंदचा परिणाम रविवारी येथील आवकेवर झाला.