पुणे। गेल्या तीन आठवड्यांपासून मार्केट यार्डातील घाऊक बाजारात टोमॅटोच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोला प्रती किलो 40 ते 50 रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात 50 ते 80 रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. जुलै अखेरपर्यंत टोमॅटोच्या दरांबाबत अशीच परिस्थिती राहिल, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.
घाऊक बाजारात 50 रुपये
25 जून रोजी घाऊक बाजारात टोमॅटोला प्रती किलोस अवघा 10 रुपये भाव मिळत होता. त्यामध्ये वाढ होऊन 2 जुलै रोजी टोमॅटोचा भाव प्रती किलोस 20 ते 30 रुपयांपर्यंत पोहोचला. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 50 ते 65 रुपये प्रतिकिलोने विक्री होत होती. त्यामध्ये किंचित घट झाली असून सोमवारी 40 ते 50 रुपये किलो भावाने येथील घाऊक बाजारात टोमॅटोची विक्री झाली.
आवक कमी झाल्याने महागला
पुणे मार्केटयार्डात पुणे, सोलापूर, नगर, सांगली, सातारा जिल्ह्यातून टोमॅटोची आवक होत असते. यावर्षी पडलेला कडक उन्हाळा, त्यातच मान्सूनने केलेल्या विलंबामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले आहे. परिणामी आवक कमी झाली आहे. सोमवारी येथील घाऊक बाजारात दोन हजार पेटी टोमॅटोची आवक झाली. बाजारात सोमवारी सरासरी तीन ते 4 हजार पेटी टोमॅटोची आवक होत असते. त्या तुलनेत ती आवक कमी झाली त्यामुळे बाजारात टोमॅटोचा तुटवडा जाणवल्याने भावात वाढ झाली आहे.
मागणी वाढली
शेतकर्यांनी तेथील स्थानिक बाजारात टोमॅटो पाठविण्यापेक्षा पुण्यातील बाजारात पाठविणे पसंत केले आहे. त्यातच येथील बाजारात टोमॅटो खरेदीसाठी परगावहून व्यापारी येत आहेत. त्यामुळे आवकच्या तुलनेत मागणी जास्त आहे. परिणामी टोमॅटोचे भाव कडाडले आहेत.