चाकण : मित्राबरोबर झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून चिडलेल्या आठजणांच्या टोळक्याने संगनमताने दोघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांंनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील लोखंडी कोयता, लोखंडी रॉड व दगडाने त्यांना गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोये गावच्या हद्दीत रात्री उशिरा झालेल्या या भांडणात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, चाकण पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी आठ जणांवर गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. अमोल ज्ञानेश्वर राळे ( वय 17 वर्षे, रा. खेड,) यांनी फिर्याद दिली. अमोल राळे व राहुल राळे (दोघेही रा. खेड) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आकाश साहेबराव राळे (रा. कोये), शुभम बाळू भुजबळ व सोमनाथ राजेंद्र भुजबळ (रा. चाकण), अमर सुरेश राळे, विकास सुरेश राळे, निशांत दत्तात्रय महाले, वैभव संतोष बच्चे (रा. कोये) व किशोर राजेंद्र भुजबळ (रा. चाकण) यांच्यावर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. कोये येथे शुक्रवारी सायंकाळी अमोल ज्ञानेश्वर राळे याचा मित्र तेजस साहेबराव राळे याच्याबरोबर वरील लोकांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्यामुळे चिडलेल्या वरील सर्वांनी घातक हत्याराने जीवघेणा हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.