किरकोळ वादातून किनगावात दोन गटात तुंबळ हाणामारी ; तिघे जखमी, दोन्ही गटाच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा

0

यावल- किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर तालुक्यातील किनगाव खुर्द येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने तीन जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली. दोन्ही गटातील परस्पर फिर्यादीवरून आठ जणांवर दोन वेगवेगळे गुन्हे यावल पोलिसांनी दाखल केले आहेत. किनगाव खुर्द येथील छोटू अब्बास पटेल यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी सकाळी त्यांची पुतणी कापड धुण्यासाठी गावातील कुंडावर गेली होती. तिथे त्यांच्या गल्लीतील रहिवासी काही मुलींसोबत तिचे किरकोळ वाद झाले. यानंतर रात्री नऊ वाजता त्याच कारणावरून संशयित इम्रान अल्लू शेख, आसिफ खान अब्दुल खान, शाहरूख रफा शेख व युनूस खान आसिफचा मेहुणा या चौघांनी लाठ्या-काठ्या घेऊन फिर्यादीचा भाऊ राजू अब्बास पटेल व त्याची पत्नी शबाना यांना मारहाण केली. त्यात राजू पटेलच्या हाताला, तर शबानाच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहेे. दोघांवर यावल ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. याप्रकरणी वरील चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. दुसर्‍या गटातर्फे इम्रान शेख अलाद्दीनच्या फिर्यादीनुसार संशयित राजू अब्बास पटेल, छोटू अब्बास पटेल, संजू अब्बास पटेल व रेखा अब्बास पटेल या चौघांनी त्यांना डोक्यात व हातावर दुखापत केल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.