किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

0

एरंडोल। तालुक्यातील नागदुली येथे हातपंपावर कपडे धुण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत अनिल मोरे या 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यु झाल्याची घटना घडली. संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी भिल्ल बांधवांनी पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन केले अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख यांनी संशयीतांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

अंत्यसंस्कार रोखुन धरला
अनिल मोरे यांच्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला दोघां संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान अनिल मोरे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यांचा मृत्यु झाला. गुन्हा दाखल केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही अशी मागणी संतप्त नातेवाईक, एकलव्य संघटना व भिल समाज विकास मंचातर्फे केली.

ठिय्या आंदोलन मागे
यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, दिपक आहिरे, भोला महाले, सागर वाघ, खंडू बोरसे, पिंटू सोनवणे, सुकराम ठाकरे, ऋषिकेश सोनवणे उपस्थित होते. नागदुली येथे तणावपूर्ण वातावरण असुन शांतता आहे. मयत अनिल मोरे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.अनिलचा मृत्युने अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख व पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांनी संशयीतांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केल्यामुळे संतप्त आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

अशी घडली घटना
अनिल मोरे यांची मुलगी जयश्री ही शनिवार 19 रोजी घराजवळ असलेल्या हात पंपावर कपडे धुत होती. त्याचवेळी समोर राहणारे रशिद कबीर शेख व त्यांचा मुलगा इक्बाल रशिद शेख यांनी जयश्रीस कपडे धुण्यास विरोध केला. जयश्रीनेे ही बाब वडिलांना सांगितली. यातुन मोरे, रशिद शेख व इक्बाल शेख यांच्यात किरकोळ वाद होवून .रशिद व इक्बाल यांनी केलेल्या मारहाणीत मोरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.