किरकोळ वादातून पतीने केला पत्नीचा खून

0

जळगाव। तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील पांचाळ समाजाच्या दाम्पत्यामध्ये बुधवारी रात्री हाणामारी झाली. त्यात पतीने दारूच्या नशेत पत्नीच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केल्याने ती जखमी होऊन खाली पडली. मात्र, काही वेळानंतर तीचा मृत्यू झाला. गुरूवारी सकाळी ती मृत झाल्याचे समजल्याने कुंटुंबियांनी तिला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन गेले. मात्र, ग्रामस्थांना ही बाब माहीत झाल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तत्काळ स्मशानभूमीत जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मयत महिलेच्या पतीविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कलबाई अशोक सोनवणे मयत महिलेचे नाव आहे.

दारू पिऊन आल्यानंतर झाला वाद
शिरसोली येथील अशोक भिका सोनवणे (वय 59) आणि त्याची पत्नी कलाबाई अशोक सोनवणे (वय 55) यांच्यात दारू पिल्यानंतर दररोज वाद होत होते. बुधवारी रात्रीही दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यात अशोक सोनवणे याने पत्नी कलाबाई हिच्या छातीवर उजव्या बाजुला धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. मात्र, रात्रीच कलबाई यांचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर पोलिस येतील या भितीने सोनवणे कुटुंबियांनी कलाबाई हिचा गुरूवारी सकाळीच अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली. त्या प्रमाणे सकाळी 9 वाजताच मृतदेह स्मशानभूमीत नेऊन ठेवला. मात्र या घटनेची माहिती पोलिस पाटील श्रीकृष्ण रामदास बारी यांना मिळताच त्यांनी पोलिसांना याबाबत कळविले.

माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळ धाव
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर कलाबाईचा मृतदेह शिरसोली येथील स्मशानभूमीतून शवविच्छेदन करण्यासाठी थेट जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात आणण्यात आले. सोनवणे दाम्पत्याला करण, रितेश, शिवम, किरण आणि लखन पाच मुले तर अनिता, काजल आणि राणी या तीन मुली आहेत. त्यातील करण आणि अनिता यांची लग्न झालेली आहेत. तर उर्वरीत सहा जण हे लहान आहेत. कलाबाईचा मृत्यू झाला. तर अशोक याला अटक झाली. त्यामुळे आता या लहानग्यांचा सांभाळ कोण करणार हा प्रश्नच आहे.