किरकोळ वादातून सुरपानला एकाचा खून ; चौघांना अटक

0

साक्री- तालुक्यातील सुरपान गावात किरकोळ भांडण विकोपाला गेल्याने रतिलाल सोनवणे यांचा खुन करण्यात आल्याची घटना 19 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणी विशाल रतिलाल सोनवणे यांनी साक्री पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली.

किरकोळ कारणावरून खून
19 रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास तक्रारदारासह त्याचे वडील रतिलाल विश्राम सोनवणे (52, रा.सूरपान, ता.साक्री) हे घराच्या अंगणात असतांना संशयीत आरोपी भाऊसाहेब भटू देवरे व मयताचे भाऊ उत्तम विश्राम सोनवणे हे पार्टी करून दारू पिवून जोरजोरात आरोळ्या मारत असतांना रतिलाल सोनवणे यांनी भाऊसाहेब यांना सांगितले की मी दिवसभर शेतात काम करून थकून आलो आहे, आम्हांला झोपू द्या, असे म्हटल्याचा राग आल्याने त्यांनी वडिलांना अश्‍लील शिवीगाळ केली. आरोपी भाऊसाहेब याने रागाच्या भरात त्याचे नातेवाईक संदीप शिवाजी देवरे, विशाल शिवाजी देवरे, किरण दादाजी देवरे अशांना बोलावून आणत शिवीगाळ करून हाताबूक्यांनी रतिलाल यांना बेदम मारहाण केली. या घटनेत रतिलाल यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्याविरुत्र खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश देवरे करीत आहेत.