नवापूर : संचारबंदीच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात यासाठी अधिकाऱ्यांनी किरणा आणि भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
काही ठिकाणी किराणा दुकान, फळे, आणि भाजीपाला विक्री करण्याबाबत विक्रेत्यांच्या मनात संदिग्धता आहे. त्यांना योग्य माहिती देऊन विक्रीसाठी प्रवृत्त करावे. नगर परिषद प्रशासनाने यासाठी विशेष प्रयत्न करावे. दुकानासमोर दोन व्यतिंमधील अंतर एक मीटरपेक्षा अधिक ठेवण्यासाठी रेखांकन करावे. मनुष्यबळ किंवा मालाच्या वाहतूकीबाबत त्यांच्या समस्या असल्यास त्या दूर कराव्यात.
शक्य त्या ठिकाणी विक्रेत्यांच्या संपर्क क्रमांकाची माहिती नागरिकांना देऊन घरपोच सेवा देण्यासाठी विक्रेत्यांना प्रोत्साहित करावे. अधिक प्रमाणात फळ आणि भाजीपाला विक्रेते घरपोच सेवा देतील यासाठी प्रयत्न करावेत. अशावेळी सामाजिक संपर्काबाबतच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन होईल याकडे लक्ष द्यावे.
कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादनासाठी मार्गदर्शन करावे. ई-सेवा देणाऱ्या विक्रेत्यांच्या गोदामात वस्तू पुरेशा प्रमाणात पोहोचतील याची विशेष काळजी घेण्यात यावी. शक्य त्या ठिकाणी रेशन दुकानांचा उपयोग जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात यावा. दुकाने अधिक वेळ सुरू राहतील आणि जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणाऱ्यांवर अनावश्यक दबाव येणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.