किरण बंडगर, प्रकाश ओळेकरने मारली बाजी

0

मुंबई । मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटना आयोजित 74 किलोमीटर अंतराच्या खुल्या सायकल शर्यतीत सांगलीकरांनी बाजी मारली. स्पर्धेतील पुरुषांच्या एलिट स्पर्धेत सांगलीच्या पतंगराव कदम महाविद्यालयात कला शाखेच्या दुसर्‍या वर्षात शिकत असलेल्या किरण बंडगरने बाजी मारली, तर एमटीबी प्रकारात सांगलीचाच वसंतराव पाटील महाविद्यालयात शिकत असलेला आणि दोन वर्षापूर्वी ही स्पर्धा जिंकणारा प्रकाश ओळेकर विजेता ठरला.
दादरच्या वा.श. मटकर मार्गावरून सुरू झालेल्या या सायकल शर्यतीला राज्यातील प्रमुख सायकलपटूंचा चांगला प्रतिसाद लाभला. खुल्या आणि एमटीबी – हायब्रीड अशा दोन गटांमध्ये रंगलेल्या या शर्यतीत राज्यातील दीडशेपेक्षा जास्त सायकलपटू सहभागी झाले होते. अणुशक्ती नगर येथे शर्यतीचा न्यूट्रल झोन संपल्यावर सायकलपटूंमध्ये खरी चुरस पाहायला मिळाली. संपूर्ण शर्यतीत कोणा एका सायकलपटूला आघाडी मिळू न देता सर्वच सायकलपटू एका जत्थाने, ताशी 41 किलोमीटरच्या वेगाने सायकल पळवत होते. त्यामुळे अंतिम रेषा पार करतानाही या सायकलपटूंमध्ये काही मिलीसेकंदाचा फरक पाहायला मिळाला. सायकलपटूंनी एका समूहात अंतिम रेषा पार केली, तर पहिल्या क्रमांकाच्या सायकलपटूंने नोंदवलली वेळ त्या समूहातील इतर सायकलपटूंसाठी ग्राह्य मानली जाते या रोड सायकल रेसच्या नियमानुसार या शर्यतीतील पहिल्या चार क्रमांकाच्या विजेत्यांसाठी 1 तास 31 मिनिटे 23 सेकंद अशी वेळ नोंदवण्यात आली. एलिट गटात किरणपाठोपाठ मुंबई शहरचा धीरेन बोन्त्रा दुसरा आणि मेहेर्झाद इराणी तिसर्‍या क्रमांकाचा मानकरी ठरला. किरणला रोख 15 हजार, धीरेनला 10 हजार आणि मेहेर्झादला पाच हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. एमटीबी प्रकरात विजेत्या ठरलेल्या प्रकाशला 10 हजार, विवेक वायकरला सात आणि तिसरा आलेल्या कुणाल महावीरला पाच हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला.